रब्बी हंगामात शेतीसाठी पाच आवर्तने सोडणार : आ. कांबळे

0

पिण्यासाठीही नियोजनानुसार पाणी, मुळा- भंडारदरा व गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक

श्रीरामपूर (प्रतिनिधी)– आगामी काळात रब्बी हंगामातील नियोजनासह उन्हाळ्यातील एकूण पाच आवर्तने शेतीसाठी सोडण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठीही आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दिली.

काल दुपारी चार वाजता मुळा, भंडारदरा व गोदावरी पाटबंधारे विभागाची एकत्रित बैठक विधानभवनातील पहिल्या मजल्यावरील 145 नंबर सभागृहात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर तालुक्यात सन 2008 पासून कॅनॉल, चार्‍या पोटचार्‍या तसेच वितरका यांच्या दरुुस्ती व साफसफाईची कामे अद्यापपर्यंत करण्यात आली नसल्याचे सांगितले यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यातील चार्‍यांचा दुरुस्तीसाठी पाटबंधारेच्या यांत्रिकी विभागाकडून मशिनरीच्या साह्याने तात्काळ सुरू करण्याची मागणी केली.

तसेच आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मागणीसाठी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्र लिहून मागणी केली आहे. अनेक दिवसांपासून कामे झालेली नसल्याने आवर्तन काळात पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय होतो तसेच अनेक ठिकाणी कॅनॉल व चार्‍यांचा भराव वाहून गेल्याने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. काट्या, झुडूपे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पाण्याची वहनक्षमता कमी झाल्यामुळे पाणी असूनही अनेक शेतकर्‍यांचे भरणे शिल्लक राहिल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

त्यामुळे कामे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचेसह आमदार डॉ. सुधीर तांबे, स्नेहलताताई कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कोसाकाचे चेअरमन आशुतोष काळे, गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक मधुकर कोते गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री. लोखंडे, जलसंपदाचे नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, ज्ञानेश्‍वर काळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*