दहशत व सुडाचे राजकारण

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माझ्या आमदारकीला 40 वर्षे झाली. परंतु आम्ही कधी सुडाचे राजकारण केले नाही. आता नगर जिल्ह्यात दहशतीचे राजकारण सुरू आहे. एका आमदाराला उपोषणापासून परावृत्त करण्याऐवजी ते कसे दडपून टाकले जाईल, यासाठी शक्ती वापरली जात आहे. अधिकार्‍यांवर दबाव टाकला जात असून आमदार उपोषणाला बसलेला असताना पालकमंत्री यांनी याठिकाणी येऊन त्या आमदाराच्या प्रश्नांची सोडवणूक करणे गरजेचे होते.

पण दुर्दैवाने तसे घडले नाही. विरोधक म्हणून असेच चालणार असेल तर ते सहन करणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे आ. गटनेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना इशारा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारनेरचे आ. नीलेश लंके विविध रस्त्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. या आंदोलनास विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. आ. थोरात हेही रात्री उशिरा उपोषण स्थळी पाठिंबा देण्यासाठी आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना आ. थोरात म्हणाले, मनमाड आणि पाथर्डीचा महामार्ग हे दोन्ही रस्ते महत्त्वाचे आहेत.

हे दोन्ही राज्यातील महत्त्वाचे रस्ते आहेत. या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडलेले असून यात दररोज अपघात घडत आहेत. या रस्त्यांसाठी आ. लंके उपोषण करत असून पालकमंत्री यांनी याठिकाणी येऊन त्याची दखल घेणे आवश्यक होते. पालकमंत्री यांंनी या उपोषणाकडे दुर्लक्ष केले. तर प्रशासनाची जबाबदारी असतांना आमदार यांच्याशी चर्चा करण्यास जिल्हाधिकारी धाडस करत नाहीत, यापेक्षा दुदैवी काय? असा सवाल आ. थोरात यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राची अवहेलना

भाजपचे मंत्री, प्रवक्ते, राज्यपाल महाराष्ट्राचा सातत्याने अवमान करीत आहेत. कर्नाटक सरकार सीमा वाद उकरून काढत असून कर्नाटकात मराठी माणसे आणि महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले होत आहे. दुसरीकडे गुजरात महाराष्ट्राचे प्रकल्प पळवित आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलण्याची स्पर्धा लागली आहे. आज तर चंद्रकांत पाटील यांनी हद्द केली. महापुरूषांनी भीक मागून शाळा चालविल्या म्हणणे हा आमच्या महापुरूषांचा अपमान आहे. महापुरूषांनी शाळा सुरू करण्यासाठी पैसे भलेही मागितले असतील, मात्र त्याला भिक हा शब्द वापरणे चुकीचे असल्याचे आ. थोरात म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *