Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सामान्य माणसाचे जीवनमान बदलता आले तरच राजकारणाला अर्थ!; प्रदेशाध्यक्ष आ.थोरात यांचा मुक्त संवाद

Share

 राजकीय आयुष्यात साचलो नाही, सातत्याने प्रवाहित राहीलो

संगमनेर (प्रतिनिधी) – पाणी एकाच ठिकाणी राहिले तर शेवाळ होते. माझा आलेख प्रवाहीत राहिला आहे. तो सातत्याने उंचावत गेला…संगमनेर एका परिवारासारखं आहे. येथील जनता सोबत आहे. तोच माझ्यासाठी विश्‍वास आणि उर्जा आहे…सामान्य माणसाचे जीवनमान बदलता आले तरच राजकारणाला अर्थ आहे…अशी व्यक्तीमत्वातील विविधांनी पैलू उलगडून दाखवत काँग्रेसची राज्याची जबाबदारी अंगावर पडल्याने व्यस्त झालेले प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी निवांत वेळ काढत संगमनेरकरांनी मुक्त संवाद साधला.

मुलाखतकार डॉ. संतोष खेडलेकर यांच्याशी झालेला संवाद….
प्रश्‍न- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहात मात्र संगमनेरची देखील जबाबदारी आहे त्याकडे कसे पहाल?
आ. थोरात-प्रत्येक निवडणूकीचे स्वरुप वेगळे असते. ही देखील निवडणूक वेगळी आहे. माझ्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पडली. त्यास आज 90 दिवस झाले. राज्याची जबाबदारी घेणार्‍या व्यक्तीने आधी पाच वर्ष राज्याची तयारी करावी लागते. अशोक चव्हाण यांनी देखील चांगले काम केले. मी विविध खात्यांचे मंत्रीपद सांभाळले आहे. राज्यात फिरलो आहे. अडचणीच्या काळात ही मोठी जबाबदारी आली. कसरत करावी लागते. गाडी चालवतांना आता टॉप गिअरमध्ये चालवावी लागते. हे सर्व करत असतांना शारिरीक व मानसिक तणाव या काळात राहिला आहे. निवडणूकीत जागा वाटपाचा प्रश्‍न जटील असतो. 15 वर्ष मंत्री होतो तेव्हा राज्यातील काही अनुभव पाठीशी होता. संगमनेर एक परिवारासारखं आहे. अनेक विकास कामे केली. सर्वसामान्य जनता बरोबर आहे. तोच मोठा विश्‍वास आहे.

प्रश्‍न- आ.थोरात हे स्वतःच्याच मतदार संघात अडकून पडले का?
आ. थोरात- हा टिकेचा भाग आहे. राज्यात देखील विविध ठिकाणी प्रचारासाठी फिरतो आहे. ज्यांनी टिका केली त्यांच्यासारखे कनोली, मनोली, हसनापुर करत बसलो नाही. उलट कोण अडकून पडलं, हा प्रश्‍न त्यांच्यासाठीच आहे. मी राज्यभर फिरत आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहे.
प्रश्‍न-लोकप्रतिनिधीला वारंवार संधी न देणे या लोकांच्या मानसिकतेवर आपलं काय मत?
आ. थोरात- जनतेनं मला संधी दिली. आमदार झालो, मंत्री झालो, विविध खात्याचे मंत्रीपद सांभाळले. पक्षाने संधी दिली. गुजरातला उमेदवार निवडण्याचे काम पाहिले. चढत्या आलेखानुसार जबाबदारी सोपविण्यात आली तशी ती पूर्ण ताकदीनिशी करण्याचा प्रयत्न केला. त्याचेच फळ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या 15 जणांच्या कार्यकारीणीमध्ये समावेश झाला. आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. चांगलं काम केलं म्हणून संधी मिळत गेली. जनतेनेही देखील हेच पाहिले असेल म्हणून आत्तापर्यंत मतदार संघात दुसर्‍या कुणाला संधी मिळाली नाही. पाणी एकाच ठिकाणी राहिले तर शेवाळ होते. माझा आलेख प्रवाहीत राहिला आहे. तो सातत्याने उंचावत गेला आहे.

प्रश्‍न-विरोधक म्हणतात 35 वर्षे काय केलं?
आ.थोरात – असं विचारणं सोपं असतं. मुलगा बापाला विचारतोच ना, तुम्ही काय केलं? तसंच हे आहे. मात्र आपण विकास कामात सातत्य ठेवलं. सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत काम करत राहीलो. निळवंडे धरण पूर्ण केले. ‘आधी पुर्नवसन नंतर धरण’, राज्यातील पहिला आदर्श प्रकल्प उभा राहिला. संगमनेरकरांसाठी थेट निळवंडे धरणातून पाईपलाईन आणली. कालवे, बोगदे केले. राज्याच्या तिजोरीत पैसा नसतांना देखील प्रकल्प पूर्ण केला. स्व.विलासराव देशमुख यांचे मोठे सहकार्य लाभले. राजकारण करतांना सामान्य माणसाचे जीवनमान बदलले की नाही हे महत्वाचे आहे.

प्रश्‍न-प्रभाव टाकणारे व्यक्तीमत्व कोणते?
आ. थोरात – डॉ. आण्णासाहेब शिंदे यांच्या विचार, कार्यपद्धतीचा प्रभाव माझ्यावर आहे.

प्रश्‍न- विरोधी पक्षातील एखादा चांगला नेता?
आ. थोरात- स्व.अटलबिहारी वाजपेयी. आताच्या मंडळींशी तुलना केली तर तेव्हा त्यांचे राजकारण किती चांगले होते, असे वाटते.

प्रश्‍न-पक्ष बदल करावासा वाटला का कधी?
आ. थोरात- मत मतांतरे असू शकतील पण काँग्रेस अव्वल आहे. चांगल्या विचाराने घडलेला पक्ष आहे. स्वातंत्र्यमध्ये मोठे योगदान आहे. काँग्रेस एक तत्वाने बांधली गेली आहे. ती तत्वे सोडून काँग्रेस बदलणार नाही. मात्र जर पक्ष बदलण्याची वेळ आली तर कम्युनिष्टांमध्ये जावे लागेल.

प्रश्‍न – परिवर्तन करा संगमनेर दत्तक घेतो, अशी मागणी करणार्‍यांना काय उत्तर द्याल?
आ. थोरात – कोणी कुणाला काय दिलं, याचा विचार त्यांनीच करावा. नवलेंना कृषी महाविद्यालय, डेरेंना मेडीकल कॉलेज, होडगरांना मेडीकल कॉलेज या शैक्षणिक संस्थांना मंत्री असतांना आपण मदत केली. चांगल्या हेतूने मदत केली. जे बोलतात त्यांनी तर भावाचं देखील काढून घेतलं.

प्रश्‍न-कधी कुणाबद्दल व्यक्ती द्वेष?
आ. थोरात – आपण कधी व्यक्तीद्वेष केला नाही. संगमनेरच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्ये आहे. त्याकाळी शकुंतला थोरात यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. तेव्हा तर बी.जे.खताळ, भाऊसाहेब थोरात यांना उमेदवारी देवू शकले असते. मात्र आपण अपक्ष लढलो. विजयी झालो. शकुंतला थोरात यांना दिल्लीहूनच उमेदवारी दिली होती. तेव्हा प्रश्‍नच नव्हता द्वेष करायचा. उलट जेव्हा त्या आणि मी एकाच व्यासपीठावर नगर येथे आलो तेव्हा मी त्यांना ‘माऊली’ म्हणून संबोधले. त्या माऊलीनेच मला राजकीय जन्म दिला. आजही त्यांच्या कुटुंबियांशी माझे चांगले संबंध राहिले आहे.

प्रश्‍न -12-0 चा नारा देणार्‍यांना काय उत्तर द्याल?
आ. थोरात – ते सुरुवातीला 220चा दावा करत होते. आता काय परिस्थिती आहे? 1999 मध्ये असे झाले होते. तेव्हा अनेक दिग्गज नेते सोडून गेले. तरीही काय फरक पडला? जे नारा लावतात त्यांचाच 0-12 होवू नये, याची काळजी त्यांनी घ्यावी. भारतात बंगालचे नेते ज्योती बसू यांच्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात सलग सात वेळा आमदार झाले आहेत याचा उल्लेख मुलाखतकार खेडलेकर यांनी आवर्जून केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!