Type to search

ध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाच्या ध्यासातून ध्येयपूर्ती

माझं नाशिक

ध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाच्या ध्यासातून ध्येयपूर्ती

Share

सन 2009 ते 2014 या काळात आमची सत्ता नसल्याने विरोधात बसूनच काम करावे लागले. सत्ता कोणाचीही असली तरी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्राथमिक गरजेच्या कामांंना आपण प्रत्येक वेळी प्राधान्य दिले. सर्वसामान्य विशेषतः गोरगरिबांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेते यांच्या आशीर्वादाने आणि जनता जनार्दनाची कामे केल्यामुळे आपल्याला मतदारांनी निवडून दिले.

आपल्या निफाड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांचा सहयोग अन् सहकार्याने विविध कामे करण्यास आपण प्राधान्य दिले. निफाड तालुकाा तसा सिंचनासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असला तरी शेती सिंचनाचा, पाण्याचा प्रश्नही वारंवार उपस्थित झालेला आहे. निफाड तालुक्यात सिंचनासाठी असलेले प्रासंगिक आरक्षण, शेतीप्रधान तालुका असल्यामुळे शेतीसाठी लागणारेे पाणी, मतदारसंघातील उपलब्ध पाणीसाठा याबाबत काहीवेळा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सन 2012-13 तसेच सन 2013-14 आणि त्यानंतर सन 2015-2016 दरम्यान प्रशासनाबरोबर सुनियोजित काम केल्यामुळे मतदारसंघातील द्राक्षबागा तोडण्याची वेळ आपण येऊ दिले नाही. यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच स्थानिक आमदार विकास निधीतून मतदारसंघामध्ये सभागृह, आदिवासी भागात सभामंडप तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध कामे करण्यावर आपण नेहमीच भर दिला आहे. विद्युत विभागाची विविध कामे केली असून रस्ते, पाणी अशा प्राथमिक गरजा मी आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी मतदारसंंघात मोठ्या प्रमाणात भेडसावत होत्या आणि हाच अजेंडा घेऊन मी विविध आंदोलने, मोर्चे असा सातत्याने प्रवास सुरूच ठेवला.

गत चार वर्षांमध्ये कामांचा सतत पाठपुरावा केल्यामुळे सत्ता असतानादेखील हो-नाही म्हणत काही कामे पूर्णत्वास नेण्यास मी कमी पडलो. असे असले तरी एका उंबरठ्यावर ही कामे नेऊन ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न मी निश्चितपणे पहिल्या पाच वर्षांमध्ये केल्यामुळे त्याचा फायदा गत चार वर्षांत म्हणजेच माझ्या आमदारकीच्या दुसर्‍या टर्ममध्ये झाला. सर्वसामान्यांना उपलब्ध राहणे, मोबाईल कॉन्फरन्सवरूनच कामे करणे हा माझा पूर्वीचा अजेंडा आजही कायम आहे. माझ्या अशा कामांमुळे लोकांचे इंधन व वेळ वाचण्यास निश्चितच मदत होते. सन 2004 पासून मी हा प्रयोग अमलात आणला आहे. लोकांचा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच पीडितांनी मला फोन करावा, त्यातून त्यांची कामे होतील हा उद्देश समोर ठेवून अशा पद्धतीतून मी लोकांची अनेक कामे मार्गी लावली आहेत. अजूनही तोच प्रयत्न सुरू आहे व राहील.
सर्वसामान्यांचे ज्या शासकीय कार्यालयाकडे, विभागाकडे वा तत्सम कोठेही काम होत नसेल व ते अडून पडले असेल तर त्यात संबंधित व्यक्तीशी घरबसल्याच मोबाईल वा फोनद्वारे बोलून ही कामे मार्गी लावण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे. सर्वसामान्यांची कामे मार्गी लागावी हा प्रघात गत पंधरा वर्षांपासून माझा कायम आहे. आरोग्य समस्या, छोटी-मोठी कामे अशा विविध गोष्टींसाठी विधिमंडळात आवाज उठवण्याचे काम मी सातत्यपूर्ण करत आहे.

निफाड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून पंचायत समितीची सुसज्ज इमारत, निफाड न्यायालयाची इमारत मार्गी लावली आहे. निफाड येथे मध्यवर्ती इमारतीसाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र त्यास यापूर्वी यश मिळाले नाही. पण सत्तेत आल्यामुळे या अपेक्षा वाढल्याने आणि त्यासाठी सतत प्रयत्न केल्यामुळे या प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीसाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. यासाठी दहा कोटींची तरतूद शासनाने केली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये या इमारतीसाठी पाठपुरावा केल्यामुळे हे यश आले आहे. ही इमारत लवकरच म्हणजेच वर्षभरातच पूर्णत्वास येईल, अशी खात्री आहे. पिंपळगाव बसवंत येथे ट्रॉमा सेंटर व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते.

मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर अपघात मोठ्या प्रमाणात घडत असल्याने या अपघातात जखमी रुग्णांना ट्रॉमा सेंटरच्या माध्यमातून तात्काळ उपचार व्हावेत. यासाठी पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.त्यास यशदेखील आले असून या ग्रामीण रुग्णालयासाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या इमारतीचे बांधकामही सुरू आहे. याबरोबरच पिंपळगाव बसवंत येथे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, निवासी शाळा यांचेही काम पूर्णत्वास नेले आहे. या इमारतींचे लवकरच लोकार्पण होईल. मतदारसंघामध्ये सर्व समाजाला उपयुक्त ठरेल यासाठी सभामंडपाची आमदार निधीतून कामे केली आहेत. सन 2017-18 मध्ये मूलभूत सुविधाअंतर्गत जनसुविधाचे एक कोटी रुपये तसेच एफडीआरअंतर्गत पूरस्थिती निधीतून विविध गावांच्या ज्या स्मशानभूमी पूरपाण्यामुळे वाहून गेल्या आहेत त्या पूर्ववत होण्यासाठी बांधकाम व्हावे व त्या सुस्थितीत चांगल्या पद्धतीने याव्यात यासाठी मतदारसंघात तीन कोटी रुपये खर्च केला.

आमदार निधीतून विविध विकासकामे सुरू आहेत. मतदारसंघांमध्ये 102 कोटींच्या कामांच्या निविदा पूर्ण झाल्या असून कामे लवकरच सुरू होणार आहेत. राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून वेळोवेळी निधीही उपलब्ध करून घेतला आहे. यासाठी आपण व आपला पक्ष सत्तेत असल्याचा फायदा निशितच झाला आहे. 102 कोटी निधीच्या कामांचे कार्यारंभ आदेश लवकरच होतील. निफाड मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. शिवसेना व भाजप युती शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’तून दरवर्षी 15 किलोमीटर रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. गत चार वर्षांमध्ये व यावर्षी निफाड मतदारसंघात 30 किलोमीटरचे रस्ते केले जाणार आहेत. यामध्ये इतर जिल्हा मार्गांवर हा निधी खर्च करण्यात येतो. दरवर्षी असे एकूण पाच वर्षे ही कामे आपण करत आहोत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत (सीएमजेएसवाय) मतदारसंघात 65 ते 70 किलोमीटरच्या विविध रस्त्यांचे लोकार्पणही झाले आहे. तर काही रस्ते अंतिम चरणात आहेत. तब्बल 30 किलोमीटरचे रस्ते पूर्ण होतील, हे माझ्यादृष्टीने फार मोठे समाधानकारक यश आहे. यापूर्वी अशा रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. मात्र शिवसेना-भाजप युतीच्या शासनाने ही नवीन योजना आणून या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

स्वप्नातील प्रकल्प
मतदारसंघाला ज्या रस्त्याची प्रतीक्षा होती आणि ज्या मुद्यावरूनच माझ्यावर जी टीका होत होती तो पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला जोडण्याबरोबरच शिर्डीकडे जाणारा आणि दोन राज्यांना जोडणारा असा पथदर्शी व्यवसायासाठी शेतीपूरक ठरणारा रस्ता. तो म्हणजे पिंपळगाव बसवंत, निफाड, शिवरे, नांदूरमध्यमेश्वर, म्हाळसाकोरे, हिवरगाव, सिन्नर असा रस्ता आणि निफाड, उगाव, शिवडी, वनसगाव, खडक माळेगावमार्गे राष्ट्रीय मार्गाला जोडणारा आणि चांदवडपर्यंत जाणारा रस्ता जो माझ्या स्वप्नातील एक प्रकल्प आहे तो निफाडकरांसाठी उपलब्ध करून देणे हे माझे स्वप्न आहे.

हा रस्ता व्यवस्थित करणे हे माझे आद्यकर्तव्य, नैतिकता म्हणून या रस्ता दहा वर्षे टोलविरहित करण्यासाठी प्रयत्न केले आहे. हा स्वप्नातील प्रकल्प म्हणजेच हा रस्ता पूर्ण व्हावा, ही माझी इच्छा आहे. त्यासाठी मी सतत पाठपुरावा करून सहा ते सात महिन्यांत हा रस्ता मार्गी लागेल यासाठी माझे प्रयत्न आहेत. या रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

‘तू चाल गड्या तुला कुणाची ना भीती’ या उक्तीप्रमाणे माझे काम सुरू आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांपासून प्रत्येकाला त्रास सामाजिक जीवनात झालेलाच आहे. त्यात मी तर एक साधा कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच जनतेप्रती चांगले काम करण्याची माझी इच्छा होती आणि यापुढेही ती कायम राहील यात शंका नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!