अडीच वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला मुलगा वाढदिवशीच परतल्याने काळोखात गेलेला महाडिक परिवार फुलला

0
वडील पोपटराव व आई प्रमिला महाडिक समवेत सोमेश्वर महाडिक.
बेलापूर – म्हातारपणाचा आधार असलेला एकुलत्या एक तरुण मुलाचा शोध घेता, घेता देहभान हरपले…शरीरही थकले… रोजच पदरी निराशा…त्यामुळे कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य गेले….जवळपास सार्‍या शक्यता मावळल्या …फक्त आशेचा एक किरण बाकी होता… तो असता तर त्याचा वाढदिवस साजरा केला असता अशी चर्चा करीत सारेजण झोपले….अन् तब्बल अडीच वर्षार्ंंनी रात्री दोन वाजता अचानक त्याच्या वाढदिवशीच फोन आला… दादा मी सोमू बोलतोय, हे स्वप्नवत भाष्य खरे ठरले अन् माळेवाडीतील शेतकरी पोपटराव महाडिक यांच्या परिवाराच्या आनंदाला पारावर उरला नाही.

याबाबतची माहिती अशी की, सोमेश्वर पोपटराव महाडिक हा तरुण मार्च 2016 मध्ये 12 वी विज्ञान च्या परीक्षेला बोरावके महाविद्यालयातून बसणार होता. त्याचे जर्नल्स अपूर्ण असल्याने एका शिक्षकाने त्याला त्याचे नुकसान टळावे या हेतूने त्याला काही सूचना केल्या. त्याचे दडपण घेऊन तो 2 फेब्रुवारी 2016 रोजी कॉलेजला जातो सांगून घरून निघाला मात्र तो परत घरी आलाच नाही. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली, मित्रांनी त्याला दुपारी बस स्टॅण्डवर पाहिले होते. तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे अखेर श्रीरामपूर पोलिसात मिसिंगची फिर्याद दाखल केली. तेव्हापासून त्याचे वडील पोपटराव महाडिक यांची त्याच्या शोधासाठी पायपीट अन् भटकंती सुरू होती. पण रोज पदरी निराशाच येत होती.

दरम्यान, तो मुंबईत एका मारवाड्याच्या हॉटेलात कामाला राहिला. शांत, प्रामाणिकपणा यामुळे त्याने मालकाचा विश्वास संपादन केला. ते त्याला खूप जीव लावू लागले. पुढे त्यांनी त्याची घरची माहिती विचारली. तो मराठी असल्याने त्यांची आत्मीयता वाढली. त्याला घरी माळेवाडीला जाऊन येण्याचा आग्रह धरला. त्याप्रमाणे तो दोनदा शिर्डीत आणि एकदा थेट श्रीरामपूरला आला. पण घरचे बोलतील या भीतीने परत निघून गेला. त्याचवेळी वाटेत बस हॉटेलमध्ये चहापानासाठी थांबली. त्यावेळी त्याच्या गणेशनगर येथील संकेत नागरे या मित्राने त्याला ओळखले आणि विचारपूस केली. तेव्हा सोमूने भावाकडे जात असल्याचे सांगितले. मात्र घरून बेपत्ता असल्याचे मित्राला माहिती असल्याने त्याने भावाच्या मदतीने सोमूचे वडील पोपटराव यांच्याशी थेट रात्री दोन वाजता बोलणे करून दिले. उंदीरगाव येथील डॉ. खरात यांच्या एक नातेवाईकही त्याच बसमध्ये होत्या. त्यांचीही चांगली मदत मिळाली.

नंतर पोपटराव यांनी ठाणे येथील कार्यरत महांकाळ वाडगावचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बडाख यांना बसचे लोकेशन देऊन मुलाला सुरक्षित पणे उतरवून घेतले. त्यानंतर पुण्याहून पुतण्या राहुल महाडिक ला मुंबईला पाठविले. सोमू वाढदिवशीच दुपारी घरी आला. दोन दिवसांपूर्वीच 86 वर्षीय आजोबा निवृत्ती महाडिक यांचे निधन झाले आहे, त्यांचा या नातवात खूप जीव होता. भाऊ सोमूच्या तब्बल अडीच वर्षांनी येण्यामुळे चार बहिणी, आई प्रमिला, आजी आणि नातेवाईक यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

या सुखद बातमीमुळे सर्व नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार, गावकर्‍यांनीही आनंद व्यक्त केला. महाडिक कुटुंब मूळचे बेलापूर खुर्द येथील आहे. त्यामुळे ही श्री हरिहर केशव गोविंदांची आणि परमेश्वराची कृपा असल्याची प्रतिक्रिया पोपटराव महाडिक यांनी ‘सार्वमत’शी बोलताना व्यक्त केली. दरम्यानच्या काळात पोलीस अधिकारी राकेश ओला, दिलीप पवार, संपतराव शिंदे, सुधीर पाटील आदींनी पोपटराव यांना धीर देऊन वेळोवेळी मदत केली.

LEAVE A REPLY

*