नियोजनशून्य कारभारामुळे घोटी टोलनाक्यावर रोज होते वाहतूक कोंडी

0
कावनई  | मुंबई आग्रा महामार्गाचे पडघा ते गोंदे अशा नव्वद किलोमीटर अंतराचे चौपदरीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर घोटी येथे उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावर नियोजनाच्या अभावी आणि कर्मचाऱ्यांच्या संथ कारभरामुळे नाशिक आणि मुंबईला जाणाऱ्या वाहनधारकांना वेठीस धरले जात असून यामुळे वाहनचालकांना तासनतास वाहनांच्या रांगेत ताटकळत थांबावे लागत आहे.

यामुळे चालक वर्गातून संतापाचे वातावरण आहे.  याबाबत महामार्ग प्राधिकरणाने दखल घ्यावी अशी मागणी वाहनचालकाकडून करण्यात येत आहे.

मुंबई आग्रा महामार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर पडघे ते गोंदे या अंतरासाठी घोटी जवळ टोलनाका सुरू करण्यात आला आहे. आठ लेनच्या या टोलनाक्यातून आरंभीच्या काळात सुलभतेने टोल आकारणी करून कमी वेळेत आणि सोयीस्करपणे वाहने जात येत होती.

मात्र कर्मचाऱ्यांच्या संथ गतीने काम करणे तसेच वाहतूक कोंडी झाल्यावर ती सोडविण्यासाठी पर्यायी व्यवस्था किंवा अतिरिक्त कर्मचारी हजार नसणे अशा नियोजन शून्य कारभारामुळे टोल नाक्यावर नेहमीच दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात.

दरम्यान नेहमीच होणाऱ्या या प्रकारामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून मुंबई आणि नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालून हा प्रवास सुखकर करावा अशी मागणी वाहन चालकाकडून होत आहे.

दोन लेन बंदच : दरम्यान नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी आणि मुंबईहून नाशिकला येण्यासाठी टोल प्राधिकरणाने मोठा गाजावाजा करून प्रत्येकी एक लेन इ टोल साठी आरक्षित ठेवण्यात आली होती. याच लेनमधून रुग्णवाहिका,शववाहिका ,व्हीआयपी यांचे वाहने यांना प्रवेश आहे. मात्र इ टोल यंत्रणेला अपेक्षीत प्रतिसाद न मिळाल्याने ही यंत्रणा नामधारी ठरली आहे. असे असताना मात्र या दोन्ही लेन कायम बंद असल्याने वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.या दोन्ही लेन अत्यावश्यक वेळेत चालू कराव्यात अशी मागणी होत आहे.

दुचाकीलाही रस्ता नाही : दरम्यान या टोलनाक्याच्या दोन्ही भागाला स्थानिक नागरिकांच्या टोलमुक्त वाहनांना आणि दुचाकीना रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे.मात्र या अरुंद रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली कायम बॅरेकिड्स टाकण्यात येत असल्याने दुचाकीस्वारांनाही रस्ता मिळत नसल्याने त्यांना अडकून रहावे लागत आहे.

LEAVE A REPLY

*