Type to search

ध्यास स्वप्नपूर्तीचा : नाशिक-पुणे रेल्वे तीन वर्षांत ट्रॅकवर

माझं नाशिक

ध्यास स्वप्नपूर्तीचा : नाशिक-पुणे रेल्वे तीन वर्षांत ट्रॅकवर

Share
नाशिक-पुणे कनेक्टिव्हिटी हा नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यासाठी सरकार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दळणवळणाच्या जलद सुविधा मिळाल्यामुळे नाशिकचे अर्थकारण व समाजकारण मोठ्या प्रमाणात बदलेल. पुढील तीन वर्षात हा रेल्वे मार्ग निश्चितपणे मार्गी लावण्यात येईल. तसेच इगतपुरी-नाशिक-मनमाड तिसरा रेल्वे ट्रॅक, मनमाड इंदौर रेल्वे मार्गाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मांजरपाडा प्रकल्पाचे पुढीलवर्षी

गिरीश महाजन, पालकमंत्री

महाराष्ट्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील तीन मोठे प्रकल्प कॉस्ट शेअरिंग बेसिसवर नव्या रेल्वे लाईनसाठी मंजूर केले असून, त्यांची कामाची सुरुवात ‘महारेल’ अर्थात महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्तपणे निर्माण झालेल्या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे नाशिक महानगर आणि जिल्ह्याच्या विकासात मोठी भर पडणार आहे यात शंकाच नाही. नाशिक-पुणे कनेक्टिव्हिटी हा नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

नाशिक-पुणे-मुंबई हा खरं तर गोल्डन ट्रँगल असून, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले आहे. या ठिकाणच्या जागांचे भाव प्रचंड असून, जागेची उपलब्धता ही फारशी नाही. त्यामुळे पुणे – नाशिक याची कनेक्टिव्हिटी चांगली झाल्यास नाशिकच्या विकासाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. आगामी नाशिक – पुणे हा नियोजित लोहमार्ग 248 किमी अंतर अवघ्या अडीच तासात पार केले जावे असे नियोजन आहे.

यामुळे सध्या ट्रॅफिकमुळे लागणारा कंटाळवाणा सहा तासाचा वेळ निम्म्यावर येऊन, प्रवासी वाहनांच्या फेर्‍या कमी होऊन इंधन बचत होऊन, प्रदूषण कमी होईल. यामुळे रस्ते अपघात बंद होतील, रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेची निर्मिती होईल त्यामुळे कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पर्यावरण विषयक फायदे मिळतील. रेल्वे मंत्रालयाने आता नवीन कोचेस 220 किमी प्रति तास धावण्याच्या क्षमतेचे आणूनही रेल्वे ट्रॅकची क्षमता निम्मीच असल्यामुळे ते अपेक्षित वेगाने धावू शकत नाहीत. ही बाब नवीन लोहमार्गात दूर होणार असल्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे गाडीचा वेग दुपटीने वाढणार आहे.

नाशिक – पुणे हा पहिला लोहमार्ग या नवीन तंत्रज्ञानाने बनवला जाईल हे निश्चितच कौतुकास्पद आहे, यासाठी सरकार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दळणवळणाच्या इतक्या जलद सुविधा मिळाल्यामुळे नाशिकचे अर्थकारण व समाजकारण मोठ्या प्रमाणात बदलेल. त्याचा फायदा नाशिकच्या औद्योगिक, आर्थिक , सामाजिक, सांस्कृतिक व स्मार्ट विकासाला निश्चितपणे होईल असा मला विश्वास असून, याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन स्थानिक युवकांसाठी संधी उपलब्ध होणार आहे.

नियोजित नाशिक-पुणे हा 248 किलोमीटरचा लोहमार्ग असून, प्रकल्पाची किंमत सुमारे 5341 कोटी एकेरी लाईनसाठी, 6700 कोटी दुहेरी लाईनसाठी असेल. तर नाशिकसाठी महत्वपूर्ण अशा इगतपुरी-मनमाड 124 किलोमीटर लांबीच्या तिसर्‍या रेल्वे लाईनची किंमत साधारण 1860 कोटी रुपये इतकी असणार आहे. यामुळे इगतपुरी आणि मनमाड या दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

नाशिकच्या मनमाड-इंदोर रेल्वेमार्ग धुळे आणि मालेगाव या शहरातून जाणार असून तो 358 किलोमीटरचा असून, प्रकल्प किंमत 8 हजार 857 कोटी रुपये इतकी आहे. महाराष्ट्र रेल्वे मूलभूत सुविधा विकास कंपनी लिमिटेड ‘महारेल’ या महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने 8 ऑगस्ट 2017 रोजी सुरू केलेल्या कंपनीचे कामकाज नुकतेच जोमाने सुरू झाले आहे. या कंपनीने मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या लोहमार्ग विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या तुलनेत महारेल कंपनीने राज्यात अल्पावधीत मोठ्या प्रमाणात घेतलेले लोहमार्ग विकासाची कामे गतीने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे सर्व महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेवर कार्यान्वित होण्यासाठी व प्रकल्पांची कामे सत्वर सुरू करण्याचा दृष्टीने याबाबत स्थानिक पातळीवर सर्व संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकारी सोबत मुंबई येथे आपल्या अध्यक्षतेखाली लवकरच आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

जागतिक ‘ऑर्गन टेम्पल’ साकारणार
अवयवदानाचे महत्त्व घराघरात पोहोचावे, लोकांना अवयवदानाबाबत माहिती व्हावी आणि लोकांच्या मनातील गैरसमज दूर व्हावेत, यासाठी नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑर्गन टेम्पल उभारण्यात येणार आहे. नाशिक म्हणजे मंदिरांचे शहर. या शहराला एक आध्यात्मिक ओळख आहे. ऑर्गन टेम्पलच्या माध्यमातून अवयवदानाला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या टेम्पलच्या माध्यमातून अवयवदाते, त्यांचे कुटुंबीय यांची ओळख कायमस्वरूपी लोकांपुढे येईल. ब्रेनडेड व्यक्तीच्या शरीरातील अवयव कशा पद्धतीने काढण्यात येतात. गरजू व्यक्तीच्या शरीरात हे अवयव कसे प्रत्यारोपित करण्यात येतात याची माहिती लोकांना या ठिकाणी मिळेल.पंचवटीत सुमारे चार एकर जागेवर हे आरोग्यकेंद्र उभारण्यात येणार आहे.

शाश्वत सिंचन योजना
राज्यातील शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी अभियान, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात 447 गावे जलसमृद्ध झाली असून 74 हजार टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत 45 लाख क्युबिक मीटर गाळ उपसण्यात आल्याने धरणातील पाणी साठवण क्षमता वाढली आहे.

महावितरणतर्फे गेल्या चार वर्षात 21 हजार 940 शेतकर्‍यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 17 हजार शेतीपंपांना उच्चदाब वीजवितरण प्रणालीद्वारे वीज देण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून जाहीर केली. त्याद्वारे जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार 688 शेतकर्‍यांना 793 कोटी 29 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था झाल्यास शेतकर्‍याला खर्‍या अर्थाने समृद्ध करता येणे शक्य आहे. म्हणून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26प्रकल्पांसाठी 13 हजार 663 कोटी आणि बळीराजा सिंचन योजनेच्या माध्यमातून 83 प्रकल्पांसाठी 1700 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच राज्याला सिंचनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला असून, त्यामुळे राज्यातील सिंचन व्यवस्थेचे चित्र बदलेल, असा विश्वास मला वाटतो.

आंतरराष्ट्रीय ’योग विद्यापीठ
आंतरराष्ट्रीय स्तरावरील योग विद्यापीठासाठी नाशिकचे वातावरण योग्य असून, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. याकरिता त्र्यंबकेश्वर येथे 25 एकर जागेत हे विद्यापीठ साकारण्याचे प्रस्तावित आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जागेचा प्रश्न सुटल्यानंतर लगेच विद्यापीठाचा शुभारंभ केला जाईल. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगासनाची स्पर्धा नाशिक येथे होण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. आयुष मंत्रालयाच्या वतीनेही नाशिकमध्ये विद्यापीठासाठी चाचपणी सुरू आहे.

30 हजार नागरिकांना देणार हक्काचे घर
घरकूल योजनेत नाशिक जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर तर देशात 40 व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध घरकूल योजनांच्या माध्यमातून 21 हजार नागरिकांना हक्काचे घर मिळाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी 30 हजार घरे उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत जिल्ह्यात या योजनेचा लाभ 3 लाख 46 हजार 301 लाभार्थ्यांनी घेतला आहे. त्यांना 522 कोटी 24 लाखांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्यात किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमधून ‘अस्मिता’ योजना राबविण्यात येत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गेल्या चार वर्षात 69 हजार 400 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानात सहा महिन्यात 23 हजार नागरिकांवर उपचार करण्यात आले. स्त्रीभू्रणहत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्याबरोबरच जनजागृतीवरही भर दिला आहे. त्यामुळे गतवर्षी 923 एवढा असणारा मुलींचा जन्मदर यावर्षी 981 पर्यंत पोहोचला आहे. राज्यात सर्वात चांगली कामगिरी जिल्ह्याने केली आहे.

दोन हजार कोटींची ‘स्मार्ट’ कामे
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुंदर नाशिक शहराची संकल्पना साकार करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पांतर्गत होळकर पुलावरील कारंजे, इतिहास संग्रहालय, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नेहरु बायोडायव्हर्सिटी उद्यान, सरकारवाडा नूतनीकरण आदी कामे पूर्ण झाली आहेत. प्रकल्पाची एकूण किंमत 2 हजार 704 कोटी असून, त्याअंतर्गत 56 कामांचा समावेश आहे. या कामांमुळे नाशिकच्या पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल.

प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता
राज्यात चांगले व गुणवंत डॉक्टर्स निर्माण व्हावे, या करिता वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी संपूर्ण देशात एकच सामाईक प्रवेशपरीक्षा नीट मार्फत पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व प्रवेशप्रक्रिया नीटमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात राज्यात सर्व शासकीय व खासगी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. त्यामुळे राज्यात गुणवंत डॉक्टर्स उपलब्ध होतील. हा ऐतिहासिक निर्णय आहे.

विभागातील पहिले मराठा वसतिगृह
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी येथील दोन इमारती तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत नाशिक विभागात सुरू करण्यात येणार्‍या या पहिल्या वसतीगृहाचा मराठा समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टीने लाभ होणार आहे. मेरी संस्थेतील सी टाईप दहा आणि अकरा क्रमांकाच्या इमारती तात्पुरत्या स्वरूपात वसतिगृहासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. या विभागामार्फत या इमारतींची डागडुजी करण्यात आली आहे. येथे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

धार्मिक पर्यटनाला चालना
केंद्र शासनाच्या पर्यटनविभागामार्फत प्रसाद योजनेंतर्गत राज्यातून एकमेव त्र्यंबकेश्वर या तीर्थाची निवड करण्यात आली आहे. धार्मिक पर्यटन हा केंद्रबिंदू ठेवून भाविकांना लागणार्‍या सुविधांचा विकास यातून केला जाणार आहे. याकरीता 202 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यातील कामांना सुरुवात करण्यात आली असून, पुढील तीन महिन्यात ही कामे पूर्ण करण्यात येतील. तसेच त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. मात्र, हे भाविक केवळ कुशावर्तावर स्नान करून परतात. मात्र, गोदावरीचे मूळ उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीवर ते जाऊ शकत नाही. याकरिता आता या ठिकाणी लवकरच ‘रोप वे’करण्यात येणार आहे. हे कामही लवकरच सुरू करण्यात येणार असून, यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.

एफडीएची अत्याधुनिक लॅब
नाशिकमधील अन्न पदार्थांची नमुने तपासणी प्रयोगशाळा (फूड लॅब) आठ ते दहा वर्षांपासून बंद आहे. यामुळे येथील अन्नपदार्थ पुणे, मुंबई अथवा भोपाळला पाठवण्यात येतात. अन्न व औषध प्रशासनाचे काम थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. दुर्दैवाने नाशिकमधील अन्नपदार्थ तपासणीची प्रयोगशाळा सुमारे 10 वर्षांपासून बंद आहे. शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या आरोग्य प्रयोगशाळेत अन्नपदार्थांऐवजी केवळ पाण्याच्याच नमुन्यांची तपासणी केली जाते. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांची अन्न सुरक्षा नाशिकमधील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयावर अवलंबून आहे. एफडीएच्या वतीने पाचही जिल्ह्यांतील अन्न आणि औषधांचे नमुने वेळोवेळी तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येतात. नाशिकमधील लॅब बंद पडल्याने अन्नपदार्थांचे नमुने मुंबई, पुणे तसेच भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. यामुळे एफडीएफकडून कारवाईलाही विलंब होतो. मात्र आता मानूर येथे ही अत्याधुनिक लॅब साकारण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!