दूध उत्पादकांसाठी खूशखबर : २१ जूनपासून दरात वाढ; मात्र ग्राहकांवर भार नाही

0

मुंबई, ता. १९ : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूध खरेदीचे दर प्रती लिटर ३ रुपयांनी वाढवून देण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली असून येत्या २१ जूनपासून त्याची अमलबजावणी होईल.

तसेच भविष्यात महागाई निर्देशांक लक्षात घेऊन वर्षातून किमान एकदा प्रदत्त समितीच्या बैठकीत दूध खरेदी/विक्री दर निश्चित होणार आहेत.

या नवीन आदेशानुसार गाईचे दूध २४ रुपयांवरून २७ रुपये, तर म्हशीचे दूध ३३ वरून ३६ रुपये रुपये प्रती लिटर इतके होणार आहे.

दरम्यान शासनाने दूध उत्पादकांच्या खरेदी दरात वाढ केलेली असली तरी सर्वसामान्य जनतेला मात्र पूर्वीच्याच दराने दूध मिळणार आहे.

३.५ टक्के फॅट आणि ८.५ टक्के एस.एन.एफ असलेल्या गाईच्या दुधासाठी आणि ६.० टक्के फॅट/९.० टक्के एसएनएफ असलेल्या म्हशीच्या दुधासाठी हे दर लागू असतील.

यासंदर्भात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी यापूर्वीच घोषणा केली होती.

त्यानंतर राज्य दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या प्रदत्त समितीच्या शिफारसी विचारात घेऊन मुख्यमंत्र्यांनी १७ जून रोजीच या वाढीला मान्यता दिली होती.

LEAVE A REPLY

*