दूधाची गाडी अडविल्यावरुन वादंग 15 ते 17 जणांविरुध्द गुन्हा दाखल

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- दिल्लीकडे चाललेला ट्रक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवून त्यातील दूध व ताकांच्या पिशव्यांची नासाडी केल्याची घटना शुक्रवारी रात्री बाभळेश्‍वर-श्रीरामपूर रस्त्यावरील राजूरी येथे घडली. या प्रकरणी लोणी पोलिसांनी 15 ते 17 जणांविरूध्द गुन्हा दाखल केलेला आहे.
शेतकरी संघटनेचे शिवाजी जवरे, प्रमोद बेंद्रे, प्रशांत गोर्डे, राधाकृष्ण वाणी, अशोक कासार, दिनकर गोरे, राजेंद्र पठारे, नाना साळवे, बाबुराव शेंडगे, चंद्रकांत लोंढे, सदाशिव दरेकर, नाना लाळगे, शाम जाधव, सुभाष गोरे, गणेश लाळगे, रोहित तुपे व अन्य असे आरोपींची नावे आहेत.
शुक्रवारी रात्री प्रभात डेअरी येथून भारत डेन्स या कंपनीचा ट्रक (कंटेनर) दिल्लीच्या दिशेने जात असताना राजुरी शिवारात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तो अडविला. ट्रकमध्ये दुधाच्या पिशव्या असल्याने संतप्त आंदोलकांनी त्या रस्त्यावर फेकून दिल्या. त्यामुळे हजारो पिशव्यांची नासाडी झाली. यामध्ये ट्रकचीही तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्याने सर्वत्र पिशव्यांचा खच पडला होता. सदरची माहिती लोणी पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आंदोलक पसार झालेले होते. पोलिसांनी राजुरी, ममदापूर शिवारात आरोपींची शोधाशोध केली. परंतु ते सापडले नाहीत.
गणेश कैलास वांढेकर (रा. मोरगेवस्ती, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 15 ते 17 जणांवर लोणी पोलिसांनी नुकसानीचा गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिस आरोपींच्या शोधात आहेत.
शेतकर्‍यांना गोळ्या घालण्याची धमकी- जवरे
शुक्रवारी रात्री राजुरी येथील तलाठी कार्यालयाच्या प्रांगणात फळ-पिकांच्या संदर्भात मी सहकार्‍यांसोबत चर्चा करीत असताना राजूरी बस स्थानकाकडून शेतकर्‍यांच्या घोषणा ऐकू येऊ लागल्या. आम्ही स्टँडकडे गेलो असता या ठिकाणी प्रभात डेअरी येथून आलेला ट्रक आंदोलक शेतकर्‍यांनी अडविलेला होता. ट्रकमध्ये दुधाच्या पिशव्या असल्याने आंदोलकांनी त्या रस्त्यावर फेकल्या. याचवेळी प्रभात डेअरीचे निर्मळ घटनास्थळी आले. त्यांनी आंदोलक शेतकर्‍यांना शिवीगाळ करीत गोळ्या घालण्याची शेतकर्‍यांना धमकी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी त्यांच्या वाहनाचेही नुकसान केले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे शिवाजी जवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत लोणी पोलिसात आपण तक्रार अर्जही दिल्याचे त्यांनी सांगितले.
असा कोणताही प्रकार घडलाच नाही
प्रभातच्या गाड्या अडविल्या असल्याची माहिती मिळताच अरविंद निर्मळ त्या ठिकाणी गेले असता त्यांनी गाड्या पुन्हा माघारी घेवून जातो परंतु नुकसान करु नका असे सांगितले. त्यांनी वाद होवू नये म्हणून मध्यस्थाची भूमिका घेतली होती. त्यांनी कोणत्याही प्रकारचे पिस्तुल रोखले नाही किंवा कोणत्याही शेतकर्‍याला धमकीही दिली नाही, असा कोणताही प्रकार घडलाच नसल्याची प्रतिक्रिया प्रभात उद्योग समुहाच्या सुत्रांनी दिली.

 

 

LEAVE A REPLY

*