नाशिक, निफाडचा पारा 10 अंशांवर

 राज्यात सर्वात कमी तापमान, थंडीचा जोर वाढला

0
नाशिक । राज्यात बहुप्रतिक्षित असलेल्या थंडीचा जोर वाढला आहे. नाशिक, निफाड आणि पुण्यात पारा घसरला असून नाशिक शहरात आज 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 10.2 अंशाने पारा खाली उतरला. मालेगाव येथे 14.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

दिवाळीनंतर थंडी जाणवू लागते. तथापि गेल्या आठवड्यापर्यंत राज्यातील नागरिकांना उकाड्याचाच अनुभव घ्यावा लागत होता. आता मात्र हवामानात बदल होऊन थंडीचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. आज सकाळी नाशिक शहरावर धुक्याची चादर पसरली होती. निफाडमधील तापमानही घसरले आहे. थंडीमुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. मालेगाव येथेही तापमान घसरत आहे.

राज्यातील इतर जिह्यांतही थंडीचे प्रमाण वाढले आहे. सोलापूर जिल्ह्यात 14.1 अंश तापमान नोंदवण्यात आले. थंडीचा कडाका वाढल्याने पंढरपूर भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पुण्यातही थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, कानटोप्या आदी उबदार कपड्यांचा आधार घेत आहेत.

मराठवाड्याच्या काही भागात तसेच मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या इतर भागातील तापमान सरासरीच्या जवळपास होते.

प्रमुख शहरांतील किमान तापमान : मुंबई (कुलाबा) 23.5, सांताक्रूझ 22.2, अललबाग 21.3, रत्नागिरी 19.6, पणजी (गोवा) 20.0, डहाणू 19.9, भिरा 17.0, पुणे 11.5, जळगाव 13.0, कोल्हापूर 16.3, महाबळेश्वर 13.0, मालेगाव 14.6, नाशिक 10.4, सांगली 14.4, सातारा 13.0, सोलापूर 12.5, औरंगाबाद 13.2, परभणी 11.6, नांदेड 13.0, अकोला 13.1, अमरावती 15.2, बुलढाणा 14.0, चंद्रपूर 16.2, गोंदिया 13.8, नागपूर 12.4, वाशिम 15.0, वर्धा 13.7, यवतमाळ 12.0.

LEAVE A REPLY

*