आठवणी – शेतकर्‍यांचे पंचप्राण शरद जोशी

jalgaon-digital
2 Min Read

अनिल पाटील
मो. 9307039648

ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लाखो शेतकरी संघटित झाले होते. परदेशातील आय.ए.एस दर्जाची चांगल्या पगाराची नोकरी सोडून शरद जोशी पुण्यात परत आले होते आणि त्यांना शेती आणि शेतकर्‍यांत बदल करायचा होता. त्यासाठी त्यांनी पुणे परिसरात प्रयोग सुरू केले आणि 1982 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना झाली. प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ भागात शेतकरी मोठ्या संख्येने यात सामील झाले.

जळगाव जिल्ह्यात विनायकराव देशमुख, रघुनाथदादा, दहीवदचे चिमणराव पाटील, चोपडा तालुक्यातील भानुदास पाटील, सौ. इंदिराताई पाटील, किनगावचे यशवंत तळेले, कडू आप्पा पाटील, जळगाव खुर्दचे श्यामसुंदर बसेर, दगडू शेळके, रोझोद्याचे रवींद्र विनायकराव चौधरी यांनी जळगाव जिल्ह्यात शेतकरी संघटना उभारणीचे काम केले.जळगाव येथे स्टेडियम ग्राऊंडवर झालेल्या कर्जमुक्ती परिषद आणि संयुक्त शिव-भीम जयंती कार्यक्रमात लाखो शेतकर्‍यांनी कर्जमुक्त झाल्याची प्रतिज्ञा घेतली होती. व्ही. पी. सिंग, स्वामी अग्निवेश, राम जेठमलानी, प्रकाश आंबेडकर असे मान्यवर जळगावात आले होते.

जळगावात झालेली पहिली कर्जमुक्ती परिषद त्यावेळी देशभर गाजली होती. शेतकरी संघटनेच्या चांदवड-सटाणा येथील अधिवेशन आणि कांद्याचे आंदोलन मी जवळून पाहिले आहे. शरद जोशी यांनी जळगाव जिल्ह्यात अनेकवेळा भेट दिली आहे. माजी आमदार आणि तत्कालीन शेतकरी संघटनेचे नेते अनिलअण्णा गोटे आणि चिमणराव पाटील यांनी जळगाव, धुळे जिल्ह्यांतील सहा तालुक्यांत 72 दिवसांची पदयात्रा करून शेतकरी संघटित केले होते.

अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथून या पदयात्रेची सुरुवात होऊन शिरपूर येथे समारोप झाला होता, त्याला शरद जोशी हजर होते. जामनेर, बोदवड, सुरवाडे, एरंडोल येथे ही शरद जोशी यांच्या सभा गाजल्या आहेत. जळगाव येथे बालगंधर्व नाट्यगृहात झालेल्या जाहीर सभेत सुरेशदादा यांच्यावर प्रखर टीका केली होती. देशातील सर्व राज्याच्या शेतकर्‍यांची एकजूट त्यांनी केली होती. केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगावर त्यांनी काम केले.

राज्यसभा सदस्य असताना कृषी धोरणासाठी त्यांनी योगदान दिले होते. कॉम. शरद पाटील आणि विचारवंत रावसाहेब कसबे यांची स्त्रीमुक्ती आणि जाती अंताची विचारधारा त्यांनी समजून घेतली होती. म्हणूनच त्यांच्या चांदवड महिला अधिवेशनाला लाखो महिलांची उपस्थिती होती. शरद जोशी यांच्यानंतर अनेक संघटना आज कार्यरत आहेत. पण त्यांना शरद जोशी यांच्या कार्याची उंची गाठता येणार नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *