Thursday, April 25, 2024
Homeनगरसत्तांतरानंतर होणार्‍या नियोजन समितीच्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष!

सत्तांतरानंतर होणार्‍या नियोजन समितीच्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष!

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती : प्रशासनाची धावपळ

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आणि जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून महाविकास आघाडीचे पालकमंत्री मुश्रीफ हे पहिल्यांदा नगरला येत असून नियोजन समितीच्या माध्यमातून ते जिल्ह्याचा विकास कसा साधणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

- Advertisement -

पालकमंत्री मुश्रीफ हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असून सोमवारी होणार्‍या बैठकीत भाजपच्या पालकमंत्री यांच्या कार्यकाळात झालेल्या 15 जून 2019 जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2019-20 (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना) पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना व अनु.जाती उपयोजना) प्रारुप आराखड्यास मान्यता व आयत्या वेळी येणारे विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजन समितीत यापूर्वी देखील आमदार विरोधात जिल्हा परिषद सदस्य असा सामाना रंगलेला आहे. गेली पाच वर्षे जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. तर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे भाजपचे होते. या काळात देखील पालकमंत्री विरोधात जिल्हा परिषद सदस्य असे चित्र होते. आता महाविकास आघाडीची राज्यात आणि जिल्हा परिषदेत सत्ता आहे. यामुळे पालकमंत्री जिल्हा परिषदेला कशा प्रकारे झुकते माप देणार याकडे सदस्यांचे लक्ष राहणार आहे.

यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात आमदारांनी हस्तक्षेप करत काही हेडची (लेखाशिषर्काची) कामे पालकमंत्री यांच्या माध्यमातून परस्पर सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य सरकार यांच्याकडे वळविले होते. याबाबत नवीन पालकमंत्री काय धोरण घेणार. जिल्ह्यातील आमदारांसोबत जिल्हा परिषद सदस्यांना कसा न्याय देणार याची प्रत्यय सोमवारी होणार्‍या बैठकीत येणार आहे. सत्तांतरानंतर पालकमंत्र्यांची पहिलीच बैठक नगरला होणार असल्याने जिल्हा प्रशासनासह अन्य शासकीय विभागाची मोठी धावपळ पाहवास मिळत आहे.
…………………
जल साठ्यांचे नियोजन होणार
जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे तीन प्रमुख प्रकल्पांतून सोडण्यात येणार्‍या रब्बी व उन्हाळी आवर्तनाचे नियोजन सोमवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. मागील वर्षी जून ते ऑक्टोबर या काळात विक्रमी पावसाची नोंद झाली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्यामुळे मुळा, भंडारदरा व निळवंडे ही तिन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली. त्यातच परतीचा व अवकाळी पाऊस डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होता. लांबलेल्या या पावसामुळे धरणातून शेतीसाठी पाण्याची आवश्यकता दरवर्षीच्या तुलनेत कमी जाणवली. या पार्श्‍वभूमीवर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत काय निर्णय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या