बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी 28 ऑगस्टला बैठक

0

पंचायत समिती सभापती दीपक पटारे यांच्या भूमिकेवर सत्तेचे सूत्र अवलंबून

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापती व उपसभापतीच्या निवडीसाठी 28 ऑगस्ट रोजी सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधकानी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मागील पदाधिकारी निवडीत डावलले गेलेले व ससाणेे गटापासून दुरावलेले पंचायत समितिचे सभापती दीपक पटारे काय भूमिका घेणार यावर सत्तेचे सूत्र अवलंबून असल्याची चर्चा होत आहे.

बाजार समितिच्या सत्तेत खांदेपालट करण्यासाठी गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विद्यमान सभापती नानासाहेब पवार व उपसभापती सचिन गुजर यांना पदाचे राजीनामे देण्याच्या सूचना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव ससाणेे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गुजर यांनी राजीनामा दिला होता व तो या बैठकीतच मंजूर करण्यात आला होता. तर सभापती नानासाहेब पवार यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांचेकडे राजीनामा सादर केला होता. अंतिम मंजुरीसाठी तो जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. जिल्हा उपनिबंधकांनी तो मंजुर करुन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

बाजार समितीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे गटाची सत्ता आहे. सुमारे दोन वर्षापूर्वी झालेल्या पदाधिकारी निवडीत नानासाहेब पवार यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ टाकण्यात आली होती. सभापती पदासाठी डावलले गेल्याने दीपक पटारे यांनी ससाणेे गटाला सोडचिठ्ठी देत तालुक्यात विरोधकांशी युती करुन आघाडी स्थापन करुन नगरपालिकेचे व जि.प., प. स.चे राजकारण ढवळून काढीत ससाणे यांचा नगरपालिकेतील 25 वर्षाचा सत्तेचा रथ रोखण्यात यश मिळविले होते तर प. स. निवडणुकित राजकीय मुत्सद्देगिरीची झलक दाखवून पंचायत समितीच्या सभापती पदाची खुर्ची हस्तगत केली आहे. या निवडणुकीनंतर बाजार समितीच्या काही संचालकांना सोबत घेण्याची किमयाही पटारे यांनी केली आहे.

ससाणे यांचे कट्टर समर्थक सचिन गुजर यांना ससाणेे यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात पद मिळाले नसल्याने गुजर समर्थकांचा ससाणे यांच्यावर राजकीय दबाव वाढल्याने व पवार यांच्या निवडी प्रसंगी दरवर्षी खांदेपालट करण्याचा ठराव झाल्याने पवार यांना राजीनामा देण्याचे सांगण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र असे असले तरी ससाणे गटात इच्छुकांची संख्या मोठी आहे.

सभापती पदासाठी सचिन गुजर हे प्रमुख दावेदार असले तरी सुधीर नवले, डॉ. नितीन आसने, सोन्याबापू शिंदे हे सभापती पदासाठी इच्छुक आहेत. तर उपसभापती पदासाठी नितीन भागडे, विद्याताई भाऊसाहेब दाभाडे, मुक्ताजी फटांगरे, नंदाताई शेलार इच्छुक आसल्याची चर्चा होत आहे. या पदाधिकारी निवडीचा अंतिम निर्णय ना.विखे व ससाने घेणार आसले तरी गेल्या निवडीत दुखावले गेलेले व ससाणे यांच्यापासून दुरावलेले पंचायत समितिचे सभापती दीदपक पटारे विरोधकांची मोट बांधून सत्ताधारी गटातील इच्छुक नाराजांना सोबत घेऊन काही चमत्कार करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*