Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकवैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा 15 जूनपासून

वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा 15 जूनपासून

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 ते 22 जून या कालावधीत घेतल्या जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्रासाठी एम.डी., एम.एस., डिप्लोमा, एम.एस्सी या अभ्यासक्रमांसाठी 12 मे पासून पुढे परीक्षा घेणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते.

परंतु, सद्य: परिस्थिती लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचनांप्रमाणे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. करोना विषाणूच्या संसर्गास अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून रूग्णसेवेसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची मदत होणार आहे.

या अनुषंगाने मे महिन्यातील सत्र परीक्षा पुढे ढकलली असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. तसेच, विद्यापीठाने सत्र-दोनच्या उन्हाळी परीक्षेसाठी विनाविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी 5 मे पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. विलंब शुल्कसह 8 मे आणि अतिविलंब शुल्कासह 12 मे पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ आहे.

इंटर्न व पीजीचे विद्यार्थी सेवेत

देश व राज्यावर ओढावलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे विद्यापीठातून शिक्षण घेत बाहेर पडलेले व सध्या इंटर्नशिपच्या कालावधीतील पदवीधर डॉक्टर्स व पदव्युत्तर स्तरावरील डॉक्टर्स विद्यार्थी त्यांच्या कार्यकक्षेत अहोरात्र योगदान देत आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अद्याप या परिस्थितीत विशेष उद्दिष्ट त्यांना देण्यात आलेले नाही. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार याबाबत वेळोवेळी नियोजन केले जाईल. सध्या केवळ इंटर्न व पदव्युत्तर स्तरावरील वैद्यकीय शाखेतील विद्यार्थीच रूग्णसेवेत योगदान देत असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार अशी होईल परीक्षा :

पेपर : तारीख
पेपर- 1 : 15 जून 2020
पेपर- 2 : 17 जून
पेपर- 3 : 19 जून
पेपर- 4 : 22 जून

(वेळ : सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.muhs.ac.in

- Advertisment -

ताज्या बातम्या