वैद्यकीय पदवीधारकांनी आदिवासी भागाची सेवा करावी

0

विरोधी पक्षनेते ना. विखेः अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

लोणी (वार्ताहर)- महाराष्ट्रातील आदिवासी भागात आरोग्याचा प्रश्‍न अतिशय गंभीर आहे. हजारो बालके मृत्युमुखी पडत आहेत. प्रवरा अभिमत विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधीलकीतून आदिवासी भागात आरोग्यसेवा देण्यासाठी स्वयंमस्फूर्तीने पुढे यावे असे आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तर प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या अकराव्या दीक्षांत समारंभात 448 विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदवी प्रदान करण्यात आली.
लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात नामदार विखे पाटील लोणी येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय केळकर होते. विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी डॉ. राजेंद्र विखे, माजी कुलगुरू डॉ. एम.जे. ताकवले, कुलगुरू डॉ. शशांक दळवी, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, उपकुलगुरु डॉ. वाय. एम. जयराज, ब्रि.डी. एन. अग्रवाल, विश्‍वस्त मोनिका इनामदार, लता केळकर, सुवर्णाताई विखे, धनश्रीताई विखे, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव लाटे, विद्यापीठाचे डीन डॉ. हेमंत पवार, युवराज नरवडे, प्रवरा शिक्षण संस्थेचे सहाय्यक सचिव भारत घोगरे, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, सेवक, विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी या समारंभाला उपस्थित होते.
ना. विखे पाटील म्हणाले की, पद्मश्री विखे पाटील यांनी 1962 ला प्रवरा शिक्षण संस्था स्थापन केली. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सर्वांगीण विकास करताना पारंपरिक शिक्षणाबरोबरच तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणाची सोय ग्रामीण भागात निर्माण करून दिली. त्यावरच ते थांबले नाही तर हे विद्यापीठ उभे केले. आज देशातील नामवंत विद्यापीठात त्याचा समावेश झाला आहे.
कुलपती डॉ. विजय केळकर म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांचे विस्मरण कधीच होऊ शकणार नाही. या विद्यापीठाने जे यश मिळवले आहे ते बघण्यासाठी ते हवे होते. नॅकचा अ दर्जा विद्यापीठाने प्राप्त केला आहे. अभिमत विद्यापीठातून बाहेर पडणार्‍यांनंी आदिवासी क्षेत्रात काम करण्यासाठी ध्येय ठेवले पाहिजे. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांना खरी श्रद्धांजली हीच ठरणार आहे.
कुलगुरू डॉ. दळवी यांनी सांगितले की, विद्यापीठात 2 हजार 100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा वाढून 200, नर्सिंगच्या वाढून 50 व 100 झाल्या आहेत. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राद्वारे 7 कोर्स सुरु करण्यात आले आहेत. जगातील 27 नामांकित संस्थांबरोबर शैक्षणिक करार करण्यात आले आहेत. डॉ. राजेंद्र विखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाची घोड दौड सुरु आहे. हेरा मिर्झा, आमिष केतकर, हैप्पी पटेल, तय्यब सय्यद, कांचन हिंगाडे, रेणुका बी, अमित केतकर यांना सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. 349 पदवी, 97 पदव्युत्तर, 2 पी.एच.डी. स्तरावरील पदवी देऊन गौरविण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*