महाराष्ट्रात विस्थापितांचे प्रश्न कायम : मेधा पाटकर

0

नाशिक | मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही विस्थापितांचे प्रश्न कायम आहेत. सरकारकडून प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन झाल्याचे जरी सांगण्यात येत असले तरी अद्याप शंभर टक्के पुर्नवसन झालेले नाही. त्यामुळे यापुढेही आमची कायदेशीर लढाई सुरू आहेच परंतु वेळ आल्यास हिंसक लढाई करण्यासही आम्ही मागे पुढे पाहणार नाही असे मत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.

सरदार सरोवर प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांबाबत आज त्या विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मारकात आयोजित एका सभेत त्या बोलत होत्या. केंद्र सरकारकडून साम, दाम, दंड भेद नितीचा अवलंब करून प्रकल्पाचे काम सुरू आहे.

मागील आंदोलनात प्रकल्पाचे काम 122 मीटरवर थांबले होते परंतु आता पुन्हा 17 मीटर गेटसची उभारणी करण्यात आलेली आहे. या प्रकल्पात केंद्र शासन जातीने लक्ष घालत असून ते पुर्ण करण्यासाठी विस्थापितांची गळचेपी केली जात आहे. जमीनींना मोबदला दिला जातोय परंतु पुनर्वसनाचे काम मात्र पूर्ण झालेले नाही. सरकारबरोबर संघर्ष करण्यासाठी आम्हांला मध्य प्रदेश काँग्रेसने पाठींबा दिलेला आहे.

याशिवाय कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टीसारखे राजकीय पक्षही आमच्या पाठीशी आहेत. हा प्रकल्प पूर्ण जरी होत असला तरी तो शेकडो कुटूंबियांना विस्थापित करून पूर्ण केला जात आहे. नर्मदा नदीत समुद्राचे पाणी मिसळल्याने मागील जूनमध्येही शेतीची वाट लागली होती. पिकांचे नुकसान झाले.

जमीनीची पोत बिघडला आहे. त्यामुळे यंदाही भयानक परिस्थिती होणार आहे. सरकार गाय वाचविण्याच्या तंद्रीत आहे. परंतु सामान्य नागरिकांचे काहीही सोयरसुतक नाही. या प्रकल्पातील 38 गावातील 300 मदिंरांचे पुढे काय होणार शिवाय पशुधनाचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे आता पुढील लढाई कायदेशीर बरोबरच युध्दास्थितीसारखी असणार आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र, गुजरात येथील प्रकल्पबाधीत होते.

LEAVE A REPLY

*