Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘मेडा’च्या बदलानुसार मनपाला छोटे सौरऊर्जा प्रकल्प मंजूर

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या तीन वर्षांपासून मंजूर असलेला महापालिकेच्या 28.33 कोटींच्या प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पात महाऊर्जाच्या (मेडा) धोरणामुळे बदल झाला असून, आता नवीन छोट्या क्षमतेचे प्रकल्प उभारण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या 1650 केव्ही क्षमतेच्या प्रकल्पासाठी 7.84 कोटींचा निधीही मंजूर केला आहे.

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत महापालिकेला पाणी पुरवठा योजना मंजूर करतानाच शासनाने एप्रिल 2017 मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठीही 28 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार महापालिकने प्रकल्प अहवाल तयार करून पिंपळगाव माळवी येथे 5 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला. दरम्यानच्या काळात शासनाने सौरऊर्जा प्रकल्पाच्या उपांगाची कामे ‘मेडा’कडून करण्याचे आदेश दिले होते.

सौरऊर्जा प्रकल्पासंदर्भात 19 ऑगस्टला मुंबईत नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव यांच्या दालनात मनपा अधिकारी व महाउर्जाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली होती. ज्या ठिकाणी विजेचा वापर करायचा आहे, अशा ठिकाणी उत्पादन न करता इतर ठिकाणी उत्पादन करून वीज थेट महावितरण कंपनीस देण्याबाबतचे ओपन अ‍ॅक्सेसचे धोरण महापालिकेला लागू होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले होते. त्यामुळे पिंपळगाव माळवी येथील प्रस्तावित जागेत सौरऊर्जा प्रकल्प होऊ शकत नाही, असे मेडाचे अतिरिक्त महासंचालक विशाल शिवथरे यांनी सांगितले होते. मात्र, ज्या ठिकाणी वीज वापरायची आहे, त्याच ठिकाणी उत्पादन करण्याबाबतच्या ‘नेट मिटरिंग’च्या धोरणानुसार पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग स्टेशन परिसरात 1 मेगावॅट क्षमतेचे छोटे प्रकल्प उभारण्याचा पर्यायही त्यांनी महापालिकेला दिला होता.

मनपा कार्यक्षेत्रातील 11 पंपिंग स्टेशनच्या जागांवर छोटे प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने जागांची पडताळणी ‘मेडा’च्या सल्लागारांनी करून तसा अहवाल त्यांनी दिला होता. त्यानुसार 10 ठिकाणी छोटे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 7.84 कोटींचा निधी शासनाने दिला असून, यातून आता सुमारे दीड मेगावॅटपर्यंतचा सोलर प्रकल्प होऊ शकणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!