‘एमसीडीसी’च्या भागभांडवलासाठी ‘सहकार’ वेठीस

0

अधिकार्‍यांना सहकारमंत्र्यांकडून मोबाईल संदेश

अहमदनगर (प्रतिनिधी) –महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) भागभांडवल वाढीसाठी आता सहकार खात्यातील अधिकार्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. भ्रमणध्वनीवरून एक मेसेज सहकार विभागात काम करणार्‍या अधिकार्‍यांना पोहचत आहे. भांडवलासाठी वेठीस धरण्याचा हा प्रकार खरा असल्याची माहिती सहकारातील काही अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

काही वर्षांपूर्वी अडचणीत आलेल्या सहकारी संस्थांना आर्थिक मदतीद्वारे पूर्वपदावर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळी राज्यातील सर्व छोट्या मोठ्या संस्थांनी यातील भागभांडवल वाढीस हातभार लावला. राज्यातील सेवा संस्था, पतसंस्था या गावपातळीवर असणार्‍या संस्थांनीही महामंडळाचे शेअर्स घेतले. संस्थांचे साधारण अकरा कोटी आणि राज्य शासनाचे 100 कोटी इतकी मोठी रक्कम त्यावेळी जमा झाली.

महामंडळाचा अडचणीतल्या संस्थांना आर्थिक सक्षमतेसाठी मदत करणे हा उद्देश होता. मात्र,आता हे महामंडळच अडचणीत आल्याचे सांगून सहकारातील अधिकार्‍यांना स्वत:च्या खिशातून भागभांडवल उभारणीस मदत करण्याचा अप्रत्यक्ष आदेश जारी केला आहे. मग सहकार विकास महामंडळाकडे असलेला आधीचा पैसा कुठे गेला? हा प्रश्न पुढे आला आहे. कारण या महामंडळाने अडचणीत आलेल्या संस्थांना मदत केल्याचे ऐकिवात नाही.
भ्रमणध्वनीवरुन फिरत असलेल्या संदेशानुसार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची सोलापूरातील लोकमंगल संस्था सहकार विकास महामंडळात 50 लाखांचे शेअर्स खरेदी करणार आहे. 10 लाखांच्या शेअर्सची रक्कम सहकार खात्यातील अधिकार्‍यांकडून जमा होणार आहे.

अधिकार्‍यांच्या पदनिहाय रकमेचा आदेशच या संदेशात आहे. कनिष्ठ अधिकारी ते वरिष्ठ अधिकारी अशी अनूक्रमे 5 हजार ते 25 हजारांची विगतवारी देण्यात आली आहे. काही अधिकार्‍यांनी पैसेही पाठविल्याची माहिती मिळाली. या घटनेने सहकार क्षेत्रात काम करणार्‍या अधिकार्‍यात नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. सहकारी अधिकार्‍यांना 10 लाख रुपयांचे उद्दिष्ट दिलेले असले तरी यापेक्षा अधिक रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाच्या भागभांडवल वाढीच्या निमीत्ताने राजकीय मफंडींगफउभे करण्याची ही अफलातून आयडीया असल्याची कुजबूज आता सहकारात सुरु आहे.

सहकारात खासगीकरण
महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाचे 50 लाख रुपयांचे शेअर्स सहकार मंत्री सुभाष देशमूख यांची लोकमंगल संस्था खरेदी करणार आहे. याचा अर्थ संपूर्ण महामंडळावर लोकमंगलचा वरचष्मा निर्मितीचा हा प्रयत्न दिसतो. म्हणजे सभासदांच्या मालकीचे हे विकास महामंडळ नावात सहकाराचे दिसले तरी मालकीचा अंतर्गत कारभार मात्र खासगीकरणाचाच असेल, अशीही चर्चा फुटली आहे.

भांडवलासाठी जमा करायची रक्कम
विभागीय सहनिबंधक
– 25 हजार
जिल्हा उपनिबंधक आणि लेखापरीक्षक
– 20 हजार
तालुका उपनिबंधक
-15 हजार
सहाय्यक निबंधक आणि लेखापरीक्षक
– 10 हजार
वर्ग 1 व 2 अधिकारी – 5 हजार.

LEAVE A REPLY

*