Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: महापौर शिवसेनेच्या प्रचारापासून अलिप्त !

Share

भाजपच्या सभांना हजेरी । शहरात फिरविली पाठ

अहमदनगर (प्रतिनिधी) -भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारापासून अलिप्त असल्याचे चित्र नगरच्या राजकीय पटलावर दिसते आहे. शहरातील प्रचार सोडून ते जिल्ह्यातील भाजपच्या सभांना हजेरी लावत असल्याने शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

महापालिकेत प्रथमच भाजपने सत्ता काबीज केली. 14 नगरसेवकांच्या जोरावर बाबासाहेब वाकळे यांनी महापौर पदाची खुर्ची हस्तगत केली. शिवसेना नगरसेवकांनी त्यांना महापालिकेच्या राजकारणात कायमच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर पक्षाच्या नगरसेवकांच्या पाठबळावर वाकळे यांनी शिवसेनेला शह दिला. विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात असतानाच महापौर वाकळे हे मात्र शिवसेनेच्या प्रचारापासून अलिप्त असल्याचे चित्र आहे. उध्दव ठाकरे यांची सभा सोडता महापौर वाकळे हे अनिल राठोड यांच्या कोणत्याच व्यासपीठावर दिसले नाहीत.

राहुरी मतदारसंघात मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेपूर्वी ते सिध्दटेक येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेलाही उपस्थित होते. दोन दिवस राहाता मतदारसंघात त्यांनी मंत्री विखे यांचा प्रचार केला. जिल्ह्यातील मतदारसंघात प्रचाराला जाणारे वाकळे मात्र नगर शहरात शिवसेनेच्या प्रचारापासून अलिप्त असल्याने शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

बोलविल्याशिवाय नाही..!
जेथे शिवसेनेला गरज वाटेल तेथे बोलविते. बोलविल्यानंतर प्रचाराला जातो असे सांगत त्यांचे समर्थक मात्र शिवसेना बोलवितच नसल्याचा दावा केला आहे. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असल्याने त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. बोलविणं आल्याशिवाय महापौर वाकळे शिवसेनेच्या प्रचाराला जातील तरी कसे? असा सवाल त्यांचे समर्थक तसेच भाजपच्या ठराविक नगरसेवकांनी केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!