पाथर्डी : देशवासीयांच्या कल्याणासाठी मायंबा येथे आज महायज्ञ

0
पाथर्डी (प्रतिनिधी) – देशावरील युद्धाचे संकट टळून अतिरेक्यांच्या कारवाया थांबाव्यात, सर्व देशवासीयांचे कल्याण होऊन शांतता, सौख्य व समृध्दी नांदावी, यासाठी श्रीक्षेत्र मायंबा येथे आज सोमवार दि. 4 रोजी 111 कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री कीर्तनानंतर महाप्रसादाने कुंडीयज्ञाची सांगता होणार असल्याची माहिती देवस्थान समीतीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांनी दिली.
मायंबा येथील मच्छिंद्रनाथ देवस्थान, नाशिक येथील चैतन्य शिवगोरक्षनाथ मंदिर व भूगाव (जि. पुणे) येथील नवनाथ मठ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र मायंबा येथे 111 कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या एक दिवसीय महायज्ञासाठी नगरसह नाशिक, पुणे, बीड व राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भावीक उपस्थीत राहणार आहेत. महायज्ञासाठी काही भाविक मायंबा गडावर दाखलही झाले आहेत.
हजारो वर्षापूर्वी मच्छिंद्रनाथांच्या इच्छेनुसार त्यांचे परमशिष्य गोरक्षनाथांनी श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे महायज्ञ केला होता. त्यानंतर एवढया भव्य प्रमाणात प्रथमच यज्ञसोहळा श्रीक्षेत्र मायंबा येथे साजरा होत आहे. राज्याच्या विविध भागांतून वेदशास्र संपन्न असे अनेक ब्रह्मवृंद उपस्थित राहून मंत्रोच्चारात होमहवन करणार आहेत. महायज्ञाचा प्रारंभ सकाळी सहा वाजता होणार असून दुपारी आरती व सायंकाळी पूर्णाहुती होणार आहे. तर रात्री कीर्तनानंतर महाप्रसाद होऊन महायज्ञाची सांगता होणार आहे.

महायज्ञाच्यावेळी दिवसभराच्या मंत्रोच्चारातून निर्माण होणार्‍या लहरी हितासाठी अंत्यत लाभदायक ठरणार आहेत. देश व देशवासीय अडचणीत येऊ नयेत यासाठी असे महायज्ञ यापूर्वी झालेले आहेत. नाथ शक्तीची दिव्य अनुभूती सर्वांनाच येईल. महायज्ञाची पूर्ण तयारी झाली आहे.
– दादासाहेब चितळे (अध्यक्ष, मच्छिंद्रनाथ देवस्थान)

LEAVE A REPLY

*