संविधान बदलून देशाची अखंडता तोडण्याचा प्रयत्न : मौलाना नौमानी

0

सावित्री-फातेमा विचारमंचच्यावतीने नगरमध्ये ऐक्य परिषद

अहमदनगर (प्रतिनिधी)- हा देश कायम अखंड राहावा, असे स्वप्न देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांनी पाहिले. परंतु, आज समाजात जातीयवादी विष पेरून हे संविधान बदलण्याचा, पर्यायी देशाची अखंडता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते हजरत मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नौमानी यांनी केला.

सावित्री-फातेमा विचारमंचच्यावतीने नगरमध्ये होणार्‍या ऐक्य परिषदेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मौलाना नौमानी बोलत होते. यावेळी जमाते इस्लामी हिंदचे राज्याध्यक्ष तौफिक असलम खान, भारतीय महिला फेडरेशनच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेश सचिव विजय ठुबे, डॉ. रफिक सय्यद, बहिरनाथ वाकळे आदी उपस्थित होते. मौलाना नौमानी म्हणाले, की ज्यांनी देश स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले,

त्यांना हा देश कायम अखंड व एकात्म हवा होता. परंतु सध्या देशात जो माहोल सुरू आहे, तो या स्वातंत्र्यविरांच्या स्वप्नांना सुरुंग लावणारा आहे. स्वातंत्र्यानंतर देश ज्या दिशेने जायला हवा होता, त्या दिशेने कमी अन् उलट्या दिशेने जास्त गेला. सध्या देशात लहान-लहान मुद्द्यांवरून एकमेकांना लढवले जात आहे. जातीयवादी लोकांचा थेट संविधान बदलण्याचा डाव आहे. परंतु ही बाब लक्षात आल्यानंतर याविरोधात लढा सुरू झाला असून, शेतकरी, विद्यार्थी, कामगार, नोकरदार आपापल्या परीने लढा देत आहेत. मात्र हा लढा विखुरलेला असल्याने प्रभावशाली नाही. त्यामुळे समविचारी लोकांनी एकत्र येऊन ही चळवळ पुढे नेणे गरजेचे आहे. सावित्री-फातेमा विचारमंचही हाच उद्देश पुढे घेऊन जात आहे.

हिंदू-मुस्लिम समाजातील दरी भरून काढण्याचे काम या ऐक्य परिषदेतून होईल, अशी अपेक्षा ठुबे यांनी व्यक्त केली. वाकळे यांनी देशातील वातावरण गढूळ झाल्याचे सांगून हिंदू-मुस्लिम विभाजनाचे हे षडयंंत्र हाणून पाडण्याचे आवाहन केले.

सावित्री-फातेमा अन् नगर –
सावित्रीबाई फुले व फातेमा शेख यांनी त्या काळात नगर येथील क्लेरा ब्रुस हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यावेळी त्यांनी एकत्र शिक्षण घेऊन एकात्मतेचा एक आदर्श घालून दिला. तोच वारसा घेऊन समविचारी लोक एकत्र येण्यासाठी सावित्री-फातेमा विचारमंचच्या झेंड्याखाली रविवारी सायंकाळी क्लेरा ब्रुस मैदानावर ही सामाजिक ऐक्य परिषद आयोजित केली आहे, असे संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*