Type to search

धुळे फिचर्स मुख्य बातम्या

धक्कादायक : आरोग्य उपकेंद्राबाहेरच प्रसूती

Share

शिरपूर तालुक्यात भरदिवसा उपकेंद्राला कुलूप, ग्रामस्थांचा संताप

जातोडे – 

शिरपूर तालुक्यातील जातोडे येथील आरोग्य उपकेंद्र भर दुपारी बंद असल्याने प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर मातेला उपकेंद्रा बाहेरच बाळाला जन्म द्यावा लागल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील जातोडे उपकेंद्रात घडली. ग्रामस्थ व गावातील महिलांच्या मदतीने उपकेंद्राबाहेरच प्रसुती करावी लागल्याने संबंधित उपकेंद्राच्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

शिरपूर तालुक्यातील जातोडे येथे शेतात सालदारकी काम करणारे रमेश पावरा यांच्या गरोदर पत्नी संगीता रमेश पावरा वय 21 यांना आज दि.17 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तीव्र वेदना होऊ लागल्या त्यामुळे संगीता पावरा यांंना जातोडे आरोग्य उपकेंद्र येथे मोटरसायकलीने नेण्यात आले. मात्र तेथे भरदुपारी उपकेंद्र बंद होते. उपकेंद्राच्या बाहेरील कंपाऊंडच्या गेटला कुलूप लावण्यात आले होते.

जातोडे येथील ग्रामस्थांनी तात्काळ उपकेंद्राच्या गेटचे कुलूप तोडले. साडी व खाटा आडव्या करून गावातील महिला व आशा स्वयंसेविका यांच्या मदतीने उपकेंद्रा बाहेरच या महिलेची प्रसुती करण्यात आली. या मातेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र तोपर्यंत एकही जबाबदार कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. यामुळे परिसरात व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

बर्‍याच वेळानंतर या ठिकाणी संबधित आरोग्य सेविका व आरोग्य सेवक दाखल झाले.घटनेची माहिती मिळाल्याने वैद्यकीय अधिक्षक या जातोडे उपकेंद्रात दाखल झाल्या. त्यांंनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली.लागोपाठ आरोग्य अधिकारी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची माहिती घेवुन वैद्यकीय अधिक्षक यांना घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी ग्रामस्थांसह जि.प सदस्य सौ अभिलाषा पाटील यांचे पती भरत भिला पाटील, माजी पं.स सदस्य जगतसिंग राजपूत, माजी उपसरपंच देवेंद्र राजपूत आदी उपस्थित होते.

जगतसिंग राजपूत –
याआधी देखील अशा घटना येथे घडल्या आहेत.जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी उपकेंद्रात हजर राहणे गरजेचे आहे.मात्र असे संबंधित गैरहजर राहत असल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो.

भरत पाटील :-
याआधी देखील उपकेंद्राना भेटी दिल्या यावेळी देखील कोणीही उपस्थित नव्हते या बाबत आज दि 17 रोजी सकाळी आरोग्य अधिकारी यांना तक्रारी निवेदन देण्यात आले होते.मात्र दुपारीच उपकेंद्रात संबधीत कोणीच हजर नसल्याने गरोदर मातेला उपकेंद्रा बाहेरच बाळाला जन्म द्यावा लागला.

तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्न कुलकर्णी :-
याबाबत प्रत्यक्ष येऊन माहिती घेतली असुन याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!