Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदोंडाईचा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह

दोंडाईचा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह

धुळे  – 

पुरोगामी महाराष्ट्रात आज देखील अल्पवयीन मुलींचे लग्न लावले जात असल्याचे प्रकार घडत असून अशीच घटना दोंडाईचा येथील कंजरभाट समाजातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह दि. 29 मे रोजी पहाटे 4 वाजता गुपचूप लावण्यात आल्याची तक्रार दुसर्‍याच दिवशी दि. 30 मे रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी दोंडाईचा पोलिस स्टेशनकडे दिली.

- Advertisement -

मात्र तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी दि. 2 जून रोजी जिल्हाधिकारी, व पोलिस अधीक्षक तसेच महिला व बालविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दोंडाईचा येथील संत कबीरदास चमचम नगर येथील कंजरभाट समाजातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह दि.29 मे रोजी पहाटे 4 वाजता समाजातील कोणत्या व्यक्तीला भनक न लागता गुपचूप विवाह सोहळा मसल्या मारूती मंदिर, मालपूर रोड दोंडायचा येथे पार पडला.

विवाह झाल्यानंतर मुलीची कौमार्य परीक्षा दोंडाईचा परिसरातील संत कबिरदास परिसरात दि. 29 मे रोजीच्या रात्री करण्यात आली. तसेच जात पंचायतच्या पंचांनी 10 हजार रूपये घेऊन विवाह लावून कौमार्य चाचणीला संमती दिली.सदर मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्याचेही प्रथमदर्शनी समजते.

वास्तवीक पाहता अत्पवयीन मुलीचा विवाह कायद्याने गुन्हा आहे. तसेच सद्यस्थितीत कोरोनामुळे लॉकडाउन सूरू असताना तहसीलदार, तथा संबंधीत अधिकारी यांची विवाहासाठी कोणतीही परवानगी न घेता विवाह संपन्न झाला. सदर घटना घडणे हे कायद्याचे उल्लंघन केली असून याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.

निवेदन देतांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.सुरेश बिर्‍हाडे, डॉ. दीपक बाविस्कर, अ‍ॅड.विनोद बोरसे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जातपंचायत विरोधी अभियानाचे प्रमुख कृष्णा चांदगुडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

सखोल चौकशी सुरू

दोडाईचा येथील अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी अनिंसतर्फे तक्रार प्राप्त झाली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

पंजाबराव राठोड,एपीआय, दोंडाईचा पोलीस स्टेशन

- Advertisment -

ताज्या बातम्या