टाकळीभान येथे दगड खाणीचे झाले बाजारतळात रुपांतर

0
टाकळीभान (वार्ताहर) – विशिष्ट ध्येय ठेवून सामाजिक कामात झोकून देऊन केलेल्या कामात यश मिळतेच. याचा प्रत्यय टाकळीभानच्या नागरिकांना आला आहे. बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांनी आठवडे बाजारला जागा उपलब्ध करून देण्यासाठी पिढ्यान्पिढ्या वापरात नसलेली जागा मोठा खर्च करून बाजारासाठी उपलब्ध करून देत स्वप्नपूर्ती केली आहे. येत्या सोमवारपासून आठवडे बाजारचे स्थलांतर होऊन या भव्यदिव्य जागेत आठवडे बाजार भरणार असल्याने पवारांच्या वक्तव्याची खिल्ली उठविणार्‍यांना ही सणसणीत चपराक बसणार आहे.
टाकळीभान गावाला मोठे गावठाण असूनही गेल्या काही वर्षांपासून आठवडे बाजारच्या जागेची दुरवस्था झाली होती. परिसरातील पंधरा ते वीस खेड्यांचा हा आठवडे बाजार असल्याने मोठा गर्दीचा बाजार. विकास योजना राबविताना आठवडे बाजारच्या जागेचा मुद्दा बाजूला ठेवून तात्कालीन सत्ताधारी गावपुढार्‍यांनी आठवडे बाजाराची जागा प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी व नंतर बाजार समिती उपबाजारसाठी दिली. गावाचा विकास तर झाला. मात्र आठवडे बाजार रस्त्यावर आला.श्रीरामपूर- नेवासा राज्य मार्गावरच बाजार आल्याने सोमवारच्या दिवशी बर्‍याचदा वाहतूक कोंडी तर छोटेमोठे अपघात घडू लागले होते. त्यामुळे निरापराधांना दुखापती होत होत्या.
गेल्या सात वर्षांपूर्वी टाकळीभान ग्रामपंचायतीची सत्ता नानासाहेब पवार यांच्या ताब्यात आली आणि बाजारतळासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी संघर्ष सुरू झाला. पूर्वीच्या सत्ताधारी गटाने खिर्डी रोडलगत असलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या जागेसाठी पणन महामंडळाकडून बावीस लाखांचे अनुदान घेऊन बाजार ओटे व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र हे बाजारतळ बसस्थानकापासून सुमारे तीन कि. मी. अंतरावर असल्याने बाजारकरूंचा खर्च वाढत असल्याने त्यांनी या ठिकाणाबाबत नापसंती व्यक्त केली व शोध सुरू झाला जागा शोधण्याचा. येथील बसस्थानक परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून पडून असलेली दगडी खाण बुजविण्याची संकल्पना पवार यांनी काही सहकारी कार्यकर्त्यांसमोर मांडली.
या कार्यकर्त्यांनी या संकल्पनेची खिल्ली उठवत ते अशक्य असल्याचे मत मांडले. मात्र ध्येयाने पछाडलेल्या पवार यांनी पाठपुरावा सुरू ठेवत या 20 फूट खोलीच्या खाणीचा प्रथम डपिंग ग्राउंड म्हणून वापर सुरू केला. गावचा केरकचरा या खाणीत पडू लागला. खोली कमी होऊ लागली. गेल्या तीन वर्षांपूर्वी ओढ्या नाल्यावर जलसंधारणाच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध झाला. मात्र बंधार्‍याच्या काठावरील शेतकर्‍यांनी या बंधार्‍यातील जादा झालेले गौणखनिज बांधावर टाकण्यास हरकत घेतल्याने पवार यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने हे गौणखनिज थेट या दगड खाणीत वाहून टाकून शेतकर्‍यांबरोबरच खाण बुजविण्याचाही प्रश्‍न निकाली काढला.

गेली पाच सहा वर्षे सातत्याने सत्तेच्या माध्यमातून पाठपुरावा करीत व ग्रामपंचायत निधीतूनही काहीखर्च करून दगडी खाणीचे सपाटीकरण करून आठवडेबाजारसाठी सुमारे तीन ते साडेतीन एकर हक्काची जागा उपलब्ध करून दिली आहे. नुकतीच पवार यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह या जागेची पहाणी केली.या जागेवर सपाटीकरणाचा अंतिम हात फिरविला जात असुू येत्या आठवड्याचा सोमवारचा बाजार भरवला जाणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले आहे. हे सांगत असताना स्वप्नपूर्तीचा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहताना दिसत होता.सामाजिक काम ध्येयाने प्रेरीत होऊन केल्यास यश हमखास मिळतेच याचे हे एक उत्तम उदाहरणच टाकळीभानच्या ग्रामस्थांना पहावयास मिळाले आहे.

LEAVE A REPLY

*