पारनेर बाजार समिती : उपसभापतींचा राजीनामा

0

सभापती म्हणतात सुजित झावरे निर्णय घेणार!

पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे यांनी राजीनामा दिल्याने तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. शासकीय दूध संघांच्या कार्यकारिणी निवडीवरून तालुका राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुखांना स्वकीयांपेक्षा आय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावर मात्र बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनीही उपसभापतींचा राजीनामा मंजुरीचे सर्व सुत्रे सुजित झावरे यांच्याकडे सोपविली आहेत.
पारनेर तालुका दूध संघ बंद असून यावर प्रशासकीय संचालक मंडळ आहे. यात काँग्रेसचे 12 व राष्ट्रवादीचे तीन संचालक आहेत. असे असताना राष्ट्रवादीने संघाचे अध्यक्षपद पळविले, असा आरोप होऊ लागला आहे. नुकत्याच झालेल्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब पठारे यांना अध्यक्षपद तर उपाध्यक्षपदी गुलाबराव डेरे यांना मिळाले आहे.
काँग्रेसचे बहुमत असताना दूध संघात काँग्रेसला डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे बाजार समितीचे उपसभापती काँग्रेसचे विलास झावरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. यामुळे तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादीच्या तालुकाप्रमुख झावरे यांना कोंडीत पकडण्याचा डाव सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद काही प्रमाणात निवळला असताना आता मात्र दूध संघात काँग्रेसचे बहुमत असताना राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला आहे. यामुळे सुपा गटातील कँग्रेसचे राहुल शिंदे यांच्या अध्यक्षपदाला पूर्ण विराम मिळाला.
यामुळे तेही या निर्णयावर नाराज असून काही बोलण्यास तयार नसून काँग्रेसचे ज्येष्ठ मंडळी याविषयी निर्णय घेतील असे म्हणत आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाराजी नाट्यामुळे पुन्हा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर मात्र येत्या दोन दिवसांत वातावरण निवळेल असे सुजित झावरे म्हणाले. तर उपसभापतींचा राजीनामा मंजूर अथवा नामंजूर करण्याचे अधिकार सभापतींकडे असताना राष्ट्रवादी तालुकाप्रमुख सुजित झावरे निर्णय घेतील, असे सांगून बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी या वादात पडणेच टाळले.

 

 

LEAVE A REPLY

*