चांदवडला जिल्ह्यातील पहिला झेंडू लिलाव सुरू

0

चांदवड | जवळपास झेंडू फुलांची हक्काची व सुरक्षित बाजारपेठ नसल्याने तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकर्‍यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी चांदवड बाजार समितीत कार्यकारी मंडळांंच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पहिल्या झेंडू लिलावास आज दि.२७ रोजी ज्येष्ठ संचालक विलास ढोमसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

दुष्काळी तालुका म्हणून सर्वदूर व शासन दरबारी परिचीत असलेल्या चांदवड तालुक्यातील शेतकरी पारंपरिक बरोबर शेतीतील बदलत्या पीक पद्धतीचा अंगिकार करण्याचे विविध प्रयोग करतांना दिसतात. त्याच अनूषंगाने गणपती, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या दरम्यान झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते या उत्सवांची वेळ साधण्याचा प्रयत्न करीत तालुक्यातील मंगरूळ, शिरूर, हिवरखेडे, चिंचोले, आडगाव, काजीसांगवी,निमगव्हाण, गणूर, विटावे, मालसाने आदी गावातील शेतकरी झेंडू फुलांची शेती फुलवित आपल्या संसारचा रथ सुभोभित करण्याचा प्रयत्न करतात.

मात्र यात जिल्हाभरात कुठेही हक्काची व सुरक्षित विक्री व्यवस्था नसल्याने शेतकर्‍यांना मुंबई, दादर, भिवंडी शेजारील गुजरात राज्यातील मोठ्या शहरात झेंडू विक्रीस न्यावा लागतो यात गुंडागर्दी, लूटमार आदी अनेक गैरप्रकाराचा सामना करावा लागतो. या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांची गरज व मागणीचा वेध घेऊन चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे व कार्यकारी मंडळ दरवर्षी आवारात झेंडूची सुरक्षित विक्री व्यवस्था करतात. त्यानूसार यंदाही शेतकर्‍यांना दिलासादायक झेंडूच्या फुलांच्या लिलावास आज बुधवार दि.२७ रोजी ज्येष्ठ संचालक विलास ढोमसे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

लिलावाच्या शुभारंभाला १००० क्रेट आवक होऊन पिवळ्या रंगाच्या फुलास कमाल ५३०० तर लाल रंगाच्या फुलांना ४४०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी ४००० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाले. यावेळी इतर तालुक्यातील शेतकर्‍यांनी देखील झेंडूची फुले विक्रीस आणलेली होती. सदर लिलाव २९ सप्टेंबर पर्यंत व दिवाळी दरम्यान १७ व १८ ऑक्टोबरला सुरू राहणार असल्याचे सभापती डॉ. कुंभार्डे यांनी सांगितले.

याप्रसंगी संचालक पंढरिनाथ खताळ, अण्णासाहेब आहेर, निवृत्ती घुले, विक्रम मार्कंड, चंद्रकांत व्यवहारे, प्रविण हेडा, संचालिका पुजा ठाकरे, प्रभारी सचिव जी. एन. गांगुर्डे, सहसचिव एच. एल. पानसरे, शेतकरी बी. बी. वाघ, ज्ञानेश्‍वर शिंदे आदी उपस्थित होते.

फुले विक्रीची रक्कम रोख स्वरूपात देण्यात येत असून शेतकर्‍यांनी बाजाराच्या मागणीनूसार फुले क्रेट मधून आणावी जेणेकरून चांगले दर मिळतील. फुलांच्या लिलाव प्रक्रियेबाबत शेतकर्‍यांच्या काही सुचना असल्यास बाजार समिती कार्यालयात संपर्क करावा.
-डॉ. आत्माराम कुंभार्डे, सभापती.

LEAVE A REPLY

*