Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मराठवाडा विरुध्द शेवगाव-पाथर्डी पाणीप्रश्‍न पेटणार

Share

पाणी उचलण्यास मनाईचा निर्णय शेतकर्‍यांवर अन्यायकारक, छावण्या बंद करणेही चुकीचे-घुले

भेंडा (वार्ताहर)- 15 ऑगस्टपर्यंत जायकवाडी जलाशयातील पाणी उचलण्यास मनाई केल्याने शेवगाव, पाथर्डीतील शेतकर्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, पाणी घेण्यास बंदी आणि चारा छावण्या बंद करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय हे दोन्ही निर्णय शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील शेतकर्‍यांवर अन्याय करणारे असल्याची टीका माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केली. एवढेच नव्हे तर त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

याबाबत बोलताना शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचे माजी लोकप्रतिनिधी चंद्रशेखर घुले पाटील म्हणाले, राज्य शासनाने 15 ऑगस्टपर्यंत जायकवाडी जलाशयातील पाणी उचलण्यास मनाई केली आहे.पाणी उचलणार्‍या शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे पाणी टंचाईच्या नावाखाली शेतकर्‍यांवर बंधने घालत असताना पंचतारांकीत एमआयडीसीतील उद्योगपतींना मात्र पाणी उचलण्याची मोकळीक दिली जात आहे.शेतकर्‍यांसाठी असलेली बंधने उद्योगपतींना का लागू नाहीत? एमआयडीसीने पाणी उचलल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करणार आहात का?

जायकवाडी जलाशय परिसरात शेतीसाठी 12 तासावरून 4 तास, कधी दिवसाआड तर कधी दोन दिवसाआड वीज आणि आंदोलन केल्यावर शेतीची वीज 6 तास करण्यात येते हे अन्यायकारक आहे. शेतीची वीज पूर्ववत व्हावी, चारा छावण्या चालूच ठेवाव्यात आणि चारा छावण्यांच्या बिलाची रक्कम त्वरित बँक खाती वर्ग करावी आदी मागण्या केल्या असून त्यांची अंमलबजावणी न झाल्यास क्रांतीदिनी 9 ऑगस्ट 2019 रोजी शेतकरी रस्तावर उतरून आंदोलनाच्या मार्गाने जाब विचारतील असा इशाराही श्री. घुले पाटील यांनी दिला आहे.

लोकप्रतिनिधी गप्प का?
शेवगाव-पाथर्डी हा सर्वाधिक पाण्याचे टँकर सुरू असलेला मतदारसंघ असताना चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला गेला. याबाबत शेवगाव-पाथर्डीचे विद्यमान लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? चारा छावण्यांची मागील बिले अद्याप मिळालेली नाहीत. मतदार संघातील 3 लाख जनता आणि मोठ्या प्रमाणात पशुधन पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून आहे. ताजनापूरसह मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांची कामे बाकी असताना जायकवाडीचे पाणी दुसर्‍या जिल्ह्यात पाठविण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबतीतही विद्यमान लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? असा सवाल श्री. घुले यांनी उपस्थित केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!