‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती

0

मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत आणि त्या तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.

राणा आणि अंजलीसोबतच मालिकेतील अजून एक व्यक्तिरेखा जिच्यावर संपूर्ण महाराष्ट्र भरभरून प्रेम करतो ती म्हणजे नंदिता वहिनी. ती जरी खलनायिका असली तरी तिच्यावर प्रेक्षक आणि चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. मालिकेत जरी नंदिता सगळ्यांना तिच्या तालावर नाचवू पाहत असली तरी खऱ्या आयुष्यात नंदिताचं पात्र साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर ही एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे. नुकतंच तिने गणेश चतुर्थी निमित्त गणेश स्तुती सादर केली आणि तिच्या हा भारतनाट्यमचा व्हिडिओ तिने तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला.

तिच्या या व्हिडीओमुळे महाराष्ट्राच्या लाडक्या नंदिता वहिनीचा एक वेगळा पैलू तिच्या चाहत्यांसमोर आला आहे. मालिकेत कुठलीही गोष्ट नीट न करू शकणारी नंदिता वहिनी खऱ्या आयुष्यात इतकं उत्तम भरतनाट्यम करते हा तिच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्काच आहे. धनश्रीची गणेश स्तुती तिच्या चाहत्यांना किती आवडली हे तिच्या व्हिडिओला मिळालेल्या तुफान प्रतिसादावरूनच कळते. तिच्या या भरतनाट्यम व्हिडिओला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अगदी एका दिवसातच तिचा हा भरतनाट्यम व्हिडिओ २५ हजारांपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिला आहे. तिच्या या गणेश स्तुतीवर चाहत्यांनी स्तुतीसुमने वाहिली आहेत. कोल्हापुरी नंदिताचा भारतनाट्यममधील हा ठसका चाहत्यांना भलताच भावला.

LEAVE A REPLY

*