Type to search

Featured सार्वमत

आंतरराष्ट्रीय संलग्नता प्राप्त मराठी शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मिळणार संधी

Share

निवडीनंतर घ्यावे लागणार प्रशिक्षण

संगमनेर (वार्ताहर)- शिक्षकांसाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असणार्‍या जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये कार्यरत असणार्‍या शिक्षकांना संबंधित शाळांवरती काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. राज्यात महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असणार्‍या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्ती देण्यासाठी सध्या जिल्हा परिषदेच्या व्यवस्थापनात कार्यरत असणार्‍या शिक्षकांना मुलाखतीद्वारे निवडून प्रतिनियुक्ती देण्यात येणार असल्याचे समजते.

राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण मिळावे म्हणून या आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2018-19 व शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची अस्थायी संलग्नता देण्यात आलेल्या अकोला, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, बुलढाणा, रत्नागिरी, लातूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये काम करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे, अध्यापनासाठी अधिक वेळ देऊ इच्छिणारे, निवड परिषदेस सामोरे जाण्याचे व उन्हाळी सुट्टीत 7 दिवसांचे निवासी प्रशिक्षण घेण्याची तयारी असणार्‍या संबंधित जिल्ह्यातीलच, जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्याच शाळांमध्ये कार्यरत असणार्‍या शिक्षकांकडून 20 मे 2019 पर्यत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.

सदर अर्ज केलेल्या शिक्षकांमधून संबंधित जिल्ह्यातील महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित असलेल्या शाळांमध्ये प्राथमिक स्तरावर प्रतिनियुक्तीवर काम करण्यासाठी योग्य शिक्षकांची निवड करण्यात येईल. या निवड झालेल्या शिक्षकांना दि. 24 ते 25 मे पर्यंत शिक्षक निवड परिषदेस बोलविण्यात येणार आहे. सदर निवड परिषदेमधून निवडण्यात आलेल्या शिक्षकांना कालांतराने संबंधित शाळेवर बदलीने नियुक्ती देण्यात येईल.

अर्जाची छाननी व शिक्षकांना निवड परिषदेसाठी वैयक्तिक ईमेलद्वारे कळविण्यात येणार आहे. निवड झालेल्या शिक्षकांना 24 ते 25 मे या काळात निवडीसाठी मुलाखत घेण्यात येईल. निवडीचा निकाल 28 मे रोजी जाहीर करण्यात येईल.
निवड करण्यात आलेल्या शिक्षकांचे निवासी प्रशिक्षण 3 ते 9 जून या कालावधीत मुंबई इथे आयोजित करण्यात आले आहे.

अहमदनगरमध्ये केवळ एक जागा
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या व्यवस्थापनाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अकोले तालुक्यातील या शाळेला आंतरराष्ट्रीय मंडळाची संलग्नता प्राप्त झाली आहे. या शाळेत प्रतिनियुक्ती होण्यासाठी केवळ एकच जागा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 16 जागा, सांगली जिल्ह्यामध्ये 14 जागा, बुलढाणा 14 जागा, औरंगाबाद 3, कोल्हापूर 3,गोंदिया 2 अकोले सात, उस्मानाबाद 13. अशा राज्यात संलग्नता प्राप्त असलेल्या शाळांमध्ये 121 शिक्षकांच्या जागा प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!