Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मराठी शाळा वाचविण्यासाठी शिक्षण समिती घेणार शिक्षणमंत्र्यांची भेट

Share

शिष्यवृत्तीचा निकाल कमी लागल्यास गटशिक्षणाधिकार्‍यांना जबाबदार धरणार

अहमदनगर (प्रतिनिधी)– शिक्षण विभागाने आरटीई शिक्षण कायद्यात बालकांचा पहिली प्रवेशासाठी 6 वर्षांची अट टाकली आहे. दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा कमी वयात बालकांना शाळेत प्रवेश देत आहेत. यामुळे त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रवेश आणि पटसंख्येवर जाणवत आहे. पहिली प्रवेशाची सहा वर्षांची अट काढण्यासाठी जिल्हा परिषदेची शिक्षण समिती थेट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांची भेट घेणार आहे. यासह शिष्यवृत्तीचा निकाल कमी अथवा शून्य टक्के लागल्यास संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी शिक्षण समितीची मासिक बैठक पार पडली.

यात हे निर्णय घेण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांची पट संख्या घटली आहे. आरटीई कायद्यानुसार पहिली प्रवेशासाठी सहा वर्षे वयाची अट टाकण्यात आली आहे. याचा फायदा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना होत आहे. या विषयावर चांगलीच चर्चा झाली. शिक्षकांच्या बदल्यांवर यावेळी वादळी चर्चा झाली. शिक्षण विभागाने यंदा शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अत्यंत कडक नियम करण्यात केले आहेत. यामुळे शिक्षकांची मोठी गैरसोय झाली असून ही गैरसोय दूर करण्यासाठी शिक्षकांच्या बदल्यांचे नियम काही प्रमाणात शिथील करण्याची मागणी सरकारकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातून शिष्यवृत्ती पास असणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. शिक्षण विभागाने मूल्यवर्धन बंद केल्यामुळे विस्तार अधिकार्‍यांचा प्रवास भत्ता आणि शाळांची 4 टक्के सादील बंद झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शाळा बंद असताना वाटण्यात आलेल्या पोषण आहाराची चौकशी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळेत काम करणार्‍या 171 शिक्षकांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा त्यांच्या अध्यापनावर विश्‍वास नसल्याचे यावरून दिसून आले. 3 अपत्य असणार्‍या शिक्षकांची संख्या 92 असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मात्र, ही संख्या पुन्हा तपासण्याचे आदेश देण्यात आलेत. बैठकीत सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, मिलिंद कानवडे, उज्वला ठुबे, विमल आगवण, सुवर्णा जगताप आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे, रामदास हराळ उपस्थित होते.

जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारा निधी तातडीने शाळा पातळीवर आणि तालुकास्तरावर वर्ग करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यात बाल आनंद मेळावे, गणित विज्ञान प्रदर्शन आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या शुल्कचा समावेश आहे. तसेच 5 वी आणि 8 वीचे वर्ग ज्याठिकाणी सुरू होऊ शकतात त्याठिकाणी तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!