Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमराठी साहित्य संमेलन पुढे ढकलणार?

मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलणार?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला करोनामुळे विविध अडचणी येत आहेत. यामुळे संमेलन पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे कळत असून साहित्य महामंडळ आयोजनाच्या परवानगीबाबत शासनाच्या भरोशावर आहे. तसेच शासन करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात देशभरातून जमणार्‍या शेकडो लोकांच्या गर्दीला परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे.

- Advertisement -

करोनाच्या संकटामुळे यंदाचे साहित्य संमेलन ऑनलाईन घ्यावे किंवा ते रद्दच करावे, असा मोठा मतप्रवाह आहे. असे असतानाही साहित्य महामंडळाने पारंपरिक पद्धतीनेच संमेलनाच्या आयोजनाचा हट्ट धरला. आता करोनाने पुन्हा डोके वर काढले असून संमेलनासाठी निमंत्रितांच्या याद्या तयार आहेत. परंतु यातल्या एकालाही अद्याप निमंत्रण गेलेले नाही.

अपवादात्मक स्थितीत ऐनवेळी निमंत्रण मिळालेच तर रेल्वे, बसगाडयांचे आरक्षण वेळेवर कसे मिळणार, सहभागासाठी करोना चाचणीचा अहवाल मागितला तर ती चाचणी आपल्या गावीच करायची की नाशिकला पोहोचल्यावर, असे अनेक प्रश्न आहेत. नाशिकमध्ये करोना रुग्ण वाढत आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ स्वत: करोनाबाधित आहेत. सध्यातरी रूग्णसंख्येत फारसा फरक पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज्य शासनही परवानगीबाबत सकारात्मक दिसत नाही. त्यामुळे हे संमेलन तर रद्द होईल किंवा पुढे ढकलले जाऊ शकते.

यासह संमेलन पुढे ढकलले तर आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या आयोजकांसमोर शासनाकडून मिळणार्‍या 50 लाखांच्या निधीचा पेच उभा राहणार आहे. नियमानुसार हा निधी 31 मार्चच्या आधी खर्च न झाल्यास तो शासनाला परत द्यावा लागेल. करोना प्रतिबंधक दिशानिर्देशानुसार संमेलनाच्या आयोजनाबाबतची माहिती शासनाला सादर करण्यात आली असून शासनाच्या परवानगीवरच संमेलनाचे आयोजन अवलंबून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या