संमेलन यशस्वी करणार : टकले

संमेलन यशस्वी करणार : टकले

नाशिक । प्रतिनिधी

करोनामुळे सर्वत्र अडचणी आहेत. तरीही या अडचणींवर मात करून नाशिकमधे होणारे साहित्य संमेलन आपण सर्वजण मिळून यशस्वी करूया असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. कोव्हीडमुळे सध्या रोज परिस्थिती बदलत आहे. संमेलनाच्या तारखेपर्यंत हि परिस्थिती निवळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

व्यासपीठावर संमेलनाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील, कार्यवाह भगवान हिरे, निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, प्रमुख समन्वयक विश्वास ठाकूर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रा. आर. पी. देशपांडे उपस्थित होते.

याठिकाणी सभेने इतिवृत्ताला मंजुरी दिली. यानंतर कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी आत्तापर्यंत झालेल्या कार्याची माहिती दिली. संमेलनाचा प्रार्थमिक आराखडा तयार आहे. या परिसराला कुसुमाग्रजनगरी नाव दिले आहे. 39 समित्यांचे काम शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्ण चालू आहे. पुस्तकप्रकाशन मंचाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 120 स्टॉल्सची नोंदणी झाली आहे. कविकट्टासाठी 3000 कविता आल्या आहेत.

ग्रंथदिंडी कुसुमाग्रजनिवास ते डोंगरे वसतिगृह ते कुसुमाग्रजनगरी असा प्रवास करेल जिल्ह्यातील साहित्यिकांचा योग्य सन्मान राखला जाईल, कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले. जातेगावकर यांनी आजपर्यंत झालेला खर्च सभेपुढे सादर केला. सभेने त्या खर्चास मंजुरी दिली.

‘ग्रंथ तुमच्या दारी’,लेखक-वाचकांतील दुवा : ठाले-पाटील

वाचन करणे ही मूलभूत प्रेरणा असून पुस्तके वाचकांपर्यंत नेण्यासाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ सारखी चळवळ वाचक व पुस्तक यांच्यातील नाते बळकट करते. तसेच वाचन संस्कृतीच्या विकासासाठी कृतीशील दिशा देते, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केले.

कुसुमाग्रज स्मारक येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेच्या उपक्रमाची माहिती ठाले-पाटील यांनी जाणून घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या उपक्रमाचे शिल्पकार विनायक रानडे यांनी स्वागत केले व योजनेची यशस्वी घोडदौड सांगितली. यावेळी दादा गोरे, कुंडलिक अतकरे, रामचंद्र काळुंखे, प्रा. शंकर बोर्‍हाडे उपस्थित होते. अशा प्रकारचे वाचन संस्कृतीच्या प्रसाराचे प्रयोग गावोगावी होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. ग्रंथ तुमच्या दारी मराठी वाचक जेथे, ग्रंथ तुमच्या दारी तेथे. ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड सुरू आहे. 2 कोटी 25 लाख रुपयांची ग्रंथ संपदा महाराष्ट्र, गोवा, गुजराथ, दिल्ली, सिल्व्हासा, तामिळनाडू, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्वर्झलॅन्ड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, मॉरिशस, ओमान, मस्कत, सॅनफ्रान्सिस्को, सिंगापूर, लंडन, श्रीलंका आदी ठिकाणी पोहोचली असून तिथे वाचकांचा प्रतिसाद लाभत आहे.

रेखा भंडारे यांनी जागवल्या आठवणी

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन त्यांच्या कन्या रेखा भांडारे यांच्या हस्ते करण्यात आले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांविषयी भावना व्यक्त करतांना दंडवत ही कविता रेखा भांडारे यांनी सादर केली. मी शालेय वयापासून तात्यांकडे जात होते. त्यामुळे खूप वेळा मी वाचनालयात त्यांच्या सोबत यायचे, तात्यांनी खूप पुस्तके लिहिली. परंतु एकाही पुस्तकाचे प्रकाशन केले नाही. त्यांच्या अक्षरबाग या पुस्तकाचे प्रकाशन प्रकाशन संस्थेने मुंबई येथे केले. दोन प्रतिभावंत कवी ग्रेस व कुसुमाग्रज यांची अलौकिक भेट कशी झाली. अशा विविध आठवणी तात्यासाहेबांच्या कार्यक्रमात बोलतांना सांगितल्या.

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळायला हवा असे तात्यासाहेब म्हणत असत, मराठी भाषेची सेवा ख्रिश्चन बांधवांनी देखील केली आहे. मराठी माणूस ज्या ज्या देशात गेला आहे तेथे मराठी भाषा बोलली जाते असे विचार बी. जी. वाघ यांनी व्यक्त केले. ज्ञानपीठ पुरस्कार विजयते तसेच सावानाचे अध्यक्ष असलेले कुसुमाग्रज यांचा मला अभिमान आहे. अनेक नाती जन्माने मिळतात, जीवनातील काही नाती ही जोडली जातात, तात्यासाहेबांनी रेखाताई यांच्यावर कवितेचे, साहित्याचे संस्कार केले आहे. अशा थोर पुरुषांच्या पायाच्या अंगठ्यामध्ये शक्ती असते, त्यातून मिळणारी उर्जा सहन करण्याची शक्ती आपल्यात असावी लागते, तो वारसा घेऊन रेखाताई चालत आहेत, असे मत सहा. सचिव अ‍ॅड. भानुदास शौचे यांनी बोलतांना व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य सचिव गिरीश नातू यांनी केले. ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाचनालयाचे कार्याध्यक्ष वसंत खैरनार, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, बालभवन प्रमुख संजय करंजकर, श्रीकांत बेणी यांच्यासह वाचक सभासद उपस्थित होते.

सावरकरांनाही आदरांजली

स्वातंत्र्यवीर सावरकर हे जहाल देशभक्त होते. त्यांच्या विचाराचे जागरण झाले पाहिजे असे विचार सहा. सचिव अ‍ॅड भानुदास शौचे यांनी सार्वजनिक वाचनालयात झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केले. यावर्षी नाशिक मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे त्याला कुसुमाग्रज नगरी हे नाव दिले आहे तर तिथल्या विचारमंचाला सावरकरांचे नाव द्यावे अशी सूचना श्रीकांत बेणी यांनी या कार्यक्रमात बोलतांना केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य सचिव गिरीश नातू यांनी केले. प्रा.डॉ.शंकर बोर्‍हाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाचनालयाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष वसंत खैरनार, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, अ‍ॅड. अभिजीद बगदे यांच्यासह सोमनाथ मुठाळ, राजा पाटेकर अमोल यादव व वाचक सभासद उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com