नामवंत साहित्यिक नाशिकचे नाव उंचावतील

नाशिक । प्रतिनिधी

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिले वर्ष वगळता 93 वर्षात पहिल्यांदा बाल साहित्य संमेलनाचा समावेश होत आहे आणि तो मान वि. वा. शिरवाडकर आणि कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला आहे; ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. शिक्षण आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. शिक्षण संस्थांनी आपल्या पाल्यांवर साहित्यिक संस्कार व्हावेत यासाठी, तसेच त्यांच्या गुणांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी संमेलनातील बालमेळाव्याला सक्रिय पाठिंबा द्यावा असे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी केले.

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाअंतर्गत बालमेळाव्याबाबतीत नाशिकचे शिक्षण अधिकारी आणि शिक्षण संस्थांचे संचालक प्रतिनिधी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरसौ. वैशाली झनकर-वीर, शिक्षण अधिकारी (माध्य.), राजीव म्हसकर, शिक्षण अधिकारी (प्राथ.), निलेश पाटोळे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ), ए.एम. बागुल, सहा.शिक्षण उपनिरीक्षक, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह संजय करंजकर, बाल मेळावा समिती प्रमुख संतोष हुदलीकर, गोखले एज्युकेशन संस्थेचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

संमेलनाचे निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून नाशिक ही मंत्रभूमी ते तंत्रभूमी आणि आता साहित्य व शिक्षणभूमी म्हणून नाव कमावलेली भूमी आहे आणि संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्व शिक्षण संस्था भक्कमपणे पाठीशी उभ्या राहत आहे, या बद्दल समाधान व्यक्त केले. विविध संस्थांकडून सहकार्य अपेक्षित आहे. याशिवाय प्रत्येक संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन जास्तीत जास्त संख्येने बाल साहित्य संमलेनात सहभागी होण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.

आपत्कालीन समिती सदस्यांची जबाबदारी निश्चित

नियोजित संमेलनासाठी आपत्कालीन नियोजन समितीची तिसरी बैठक झाली. त्यात आपत्कालीन समिती सदस्यांची कामासंदर्भात जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्याप्रमाणे सर्व समिती सदस्यांना कामाचे वाटप करण्यात आले. संमेलनानिमित्त स्थापन झालेल्या इतर समिती बरोबर व्यवस्थितपणे नियोजन करून त्या संदर्भात योग्य तो समन्वय साधणे यावर सर्वानुमते एकमत झाले. प्रामुख्याने मदत कक्ष समिती, मंडप व व्यासपीठ समिती, सभामंडप समिती, भोजन व अल्पोपहार समिती, ग्रंथप्रदर्शन, स्वयंसेवक समिती, सुरक्षा समिती, ग्रंथदिंडी समिती, वैद्यकीय समिती यांचे बरोबर योग्य तो समन्वय साधणे. तसेच वेगवेळ्या निर्माण होणार्‍या आपत्कालीन परिस्थितीत डेमो संमेलना पूर्वी आठ दिवस आधी घेण्यात येईल. शाम पाडेकर यांनी दिलेल्या वेगेगळ्या सूचनांसंदर्भात पत्रव्यवहार व संवाद साधला जाईल व त्याचे पालन केले जाईल. पुढील मीटिंग 1 मार्च रोजी होणार आहे.

सभामंडप समितीची बैठक नुकतीच झाली. दरम्यान, प्रवेशद्वार व्यासपीठ सजावट बैठक व्यवस्थेची जबाबदारी याबाबत चर्चा करण्यात आली. नाशिकमध्ये अनेक नामवंत साहित्यिक व कलाकार आहेत. तसेच भूतकाळात अनेक साहित्यिकांनी नाशिकचे नाव जगभर पोहोचवले. त्यांच्या कार्याची माहिती आकर्षक पद्धतीने दिली जाईल. तसेच नाशिक जिल्ह्यात अनेक धार्मिक व पर्यटन तसेच औद्योगिक स्थळे आहेत. त्यांची ओळख व महत्व पटवून देणारे प्रसंग उभे करण्याचा प्रयत्न राहील असे समिती प्रमुख मंजुश्री राठी यांनी सांगितले.

प्रमख व्यासपीठ हे आकर्षक राहणार आहे. त्यादृष्टीने त्याची उभारणी व सजावट करावी त्याच्या मागे छोटे कार्यालय उभारावे. माध्यम प्रतिनिधींच्या चित्रीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. कार्यक्रमस्थळी चार प्रवेशद्वार असतील. आपत्कालीन व्यवस्था, फिरते शौचालय, कोव्हिडचा विचार करून तशी आसन व्यवस्था करणे. प्रेक्षकांसाठी वैद्यकीय व्यवस्था, अग्निशामक दलाला सहकार्य करणे, स्टेजवर प्रमुख पाहुण्यांची व्यवस्था यावर चर्चा झाली.

कविकट्ट्यासाठी 2,750 कविता प्राप्त

साहित्य संमेलनामध्ये कविकट्टा हे प्रमुख आकर्षण होणार याची सर्व चिन्हे दिसू लागली आहे. आजपर्यंत या कविकट्ट्यासाठी 2750 इतक्या कविता प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित वेळ लक्षात घेता हा आकडा सहजपणे 3000 होईल असे दिसत आहे. आपले मराठी भाषिक आणि कवी संपूर्ण भारतातच नव्हे तर परदेशातूनही वास्तव्य करतात. संमेलनाच्या निमित्ताने असे अनेक कवी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.

संमेलनामध्ये केवळ महाराष्ट्राच नव्हे तर भारतातील विविध राज्यातील कवी आणि कवयित्री येत आहेत. यामध्ये गोवा राज्यातून अंजली चितळे, रिया लोटलीकर, संजय घुग्रेटकर, मंद सुंगिरे, सानिका देसाई, कर्नाटकमधून कविता वालावलकर, गुजरात मधून वैजयंती दांडेकर, अंजली मराठे, वैशाली भागवत, मध्यप्रदेश मधून उषा ठाकूर, रजनी भारतीय, नवी दिल्लीहून राधिका गोडबोले यांचा सहभाग आहे. याखेरीज अमेरिकेतून डॉ. गौरी कंसारा आणि सिंगापूरमधून स्मिता भीमनवार याही आपल्या कविता सादर करणार आहेत.

जादा देणगी देणार्‍यांचा शोध

साहित्य संमेलनास आता कमी दिवसांचा कालावधी राहिल्याने आवश्यक तो निधी जमविण्यासाठी समित्यांचे पदाधिकारी, सदस्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. पाच हजारापेक्षा अधिक देणगी देणार्‍या व्यक्ती, संस्थांचा शोध घेण्याची जबाबदारी काही समित्यांवर सोपविली गेली आहे. सदस्यांनाही 100 रुपये देणगीची पुस्तके देऊन निधी संकलनास सांगण्यात आले आहे. संमेलनाचे काम जलद व्हावे यासाठी 39 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

समित्यांच्या कामकाजासाठी खास नियमावली आखून देण्यात आली आहे. मध्यंतरी समिती सदस्यांकडून शुल्क घेण्याची सूचना स्वागताध्यक्षांनी केली होती. करोना काळातील या संमेलनाच्या खर्चात बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे शक्य त्या मार्गाने निधी संकलनाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाच हजारापेक्षा अधिक देणगी देणार्‍या व्यक्ती, संस्था यांचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे. समिती सदस्यांनी कमीत कमी 100 देणगीदार शोधणे संयोजकांना अपेक्षित आहे. समित्यांमध्ये काम करणार्‍या प्रत्येक सदस्याने किमान 500 रुपये देणगी देणे अभिप्रेत आहे. शिवाय समितीतील प्रत्येक सदस्याला 100 रुपयांच्या 100 पावत्या असणारे पावती पुस्तक दिले जाईल. कोणावर कोणताही दबाव न आणता 100 रुपये देणगी मूल्य प्रत्येकाने जमाकरण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे.

माहितीवर निर्बंध

संमेलनासाठी स्थापित बैठकांची आणि त्यात झालेल्या निर्णयांची माहिती पूर्वपरवागीशिवाय परस्पर एकही सदस्य समाज माध्यमाद्वारे देणार नाही. त्याची जबाबदारी समिती प्रमुख, उपप्रमुखावर सोपविली गेली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *