नाशिक । प्रतिनिधी Nashik

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लागणारे बिल्ले, मानपत्र, बॅनर्स यांचे नमुने कलाकारांनी संमेलन कार्यालयात जमा करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

संमेलनासाठी विविध साधनांची गरज भासणार आहे. त्यासाठी कलाकारांनी आपण केलेले स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, सहभाग प्रमाणपत्र, ओळखपत्र, बिल्ले, बॅनर्स, बॅचेस, मुखपट्टी (मास्क), बॅग अशा विविध कामाचे नमुने रविवारपर्यंत संमेलन कार्यालयात सादर करावे. कुठल्याही कलाकृतीवर आपले नाव, बोधचिन्ह काहीही टाकू नये, असे सांगण्यात आले आहे.

सन्मानचिन्ह, सन्मानपत्र हे कायमस्वरूपी सन्मानाने ठेवावी असे असावे, महनीय व्यक्तींपासून ते नवोदित साहित्यिक यापर्यंत सर्वांना स्मृतिचिन्हे देण्याचा मानस आहे. छोट्यापासून मोठी साइजपासून ती कलाकृती रेखीव दिसावी, मटेरियल काय असेल व कसे उपलब्ध होईल याची थोडक्यात माहिती लिखित स्वरूपात द्यावी, नाशिकमध्येच तातडीने बनविण्याची गरज पडल्यास ते मटेरियल उपलब्ध असावे, आपणच बनवून देणार असाल तर साधारण 500 नग छोटे-मोठे किती दिवसात उपलब्ध करू शकतात याची थोडक्यात माहिती द्यावी.

ही स्पर्धा नाही त्यामुळे सर्वांच्या कलांचा आदर करण्यासाठी हा विचार पुढे आला आहे. जे विविध क्षेत्रातील या विषयातील जाणकार आहेत त्यांच्याशी सल्ला मसलत करून पुढील कलाकृती फायनल केली जाईल. इच्छुकांनी आपल्या कलाकृती संमेलनाच्या कार्यालयात रविवारपर्यंत (दि.21) सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद स्वरूपात सादर करावे. अधिक माहितीसाठी मिलिंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.