साहित्य संमेलन : पारंपारिक नामवंत लेखकांच्या पुस्तक विक्रीला उत्तम प्रतिसाद

तरुणांई सोशल मीडियाकडून पुस्तकांकडे
साहित्य संमेलन : पारंपारिक नामवंत लेखकांच्या पुस्तक विक्रीला उत्तम प्रतिसाद

कुसुमाग्रज नगरी |नाशिक| संदीप वाकचौरे

नाशिक शहरात सुरू झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मांडण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशनासाठी मोठ्या प्रमाणावर रसिकांचा प्रतिसाद मिळत आहे. रसिकांनी मोठ्या प्रमाणावरती पुस्तक स्टॉलला भेटी दिल्या असल्या ,तरी नव्या पुस्तकांपेक्षा जुन्या पारंपारिक पुस्तकांचा खप अधिक असल्याचे चित्र समोर आले आहेत.

कुसुमाग्रज नगरीमध्ये उभारण्यात आलेल्या ग्रंथनगरीत सुमारे सव्वा दोनशे पेक्षा अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. या ग्रंथप्रदर्शनात महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशकां सोबतच वेगवेगळ्या ठिकाणी लहान ,मोठे प्रकाशक यांचाही सहभाग राहिला आहे. शासकीय प्रकाशकांच्या पुस्तक स्टॉलमध्ये वाचकांची गर्दी दिसून आली.

ग्रंथ प्रदर्शनामध्ये तरुणाईचा मोठा उत्साह दिसून येत आहेत. सातत्याने समाज माध्यमांमध्ये रमलेली तरुणाई पुस्तकाकडे वळू लागल्याचे चित्र हे यानिमित्ताने समोर आले आहेत .त्याच बरोबर पुस्तक खरेदीसाठी सहभागी झालेले रसिक हे जुन्या पुस्तकांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी होत असल्याचे दिसून आले आहे‌ सानेगुरुजी ,सावरकर, खांडेकर ,शिवाजी सावंत ,इंदिरा संत ,मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज ,यासारख्या लेखकांच्या पुस्तकालाही मोठी मागणी असल्याचे चित्र आहे.

त्याचबरोबर यशाचे मंत्र सांगणारी, अर्थव्यवस्थेत सोबत वैज्ञानिक विषयावरची व माहिती तंत्रज्ञानशी संबंधित पुस्तकांकडे ही वाचकांचा कल वाढला असल्याचे चित्र समोर आले आहे. महिला वर्गाने देशील आहार, आरोग्यासंबंधी विविध प्रकारच्या मेनू ची माहिती देणाऱ्या पुस्तकांना पसंती दिल्याचे चित्र आहे .अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असले तरी नेहमी पेक्षा वाचकांचा प्रतिसाद मात्र कमी असल्याचे प्रकाशकांच्या वतीने सांगण्यात आले. काही प्रकाशकांच्या पुस्तक विक्री ला खूपच कमी प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले.

पुस्तक विक्रीला फटका

नाशिक सारख्या महानगरात मोठ्या अपेक्षेने अनेक प्रकाशकांनी आपले स्टॉल मांडले आहे. मात्र शहराच्या बाहेर संमेलन भरविण्यात आले असून, त्याचबरोबर कोरोनाची पार्श्वभूमी यामुळे अपेक्षित प्रमाणात पुस्तक विक्रीचा लाभ होऊ शकलेल्या नाही. चपराक प्रकाशनाचे घनशाम पाटील यांच्या प्रकाशन स्टॉल वरती लेखक आणि वाचक यांचा संगम झालेला दिसून आला.अनेक नवोदित लेखक व वाचकांची मांदियाळी दिसून आली.

संमेलनाला एसटीचा फटका

राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळपास बंद आहेत. अशा परिस्थितीत सामान्य ग्रामीण भागातील रसिकांना मात्र साहित्य संमेलनातील आपल्या आवडत्या लेखकांना भेटता येऊ शकलेले नाही. त्याचबरोबर अनेकांना कवी संमेलन, परिसंवाद यातही सहभाग घेता आलेला नाही. त्यामुळे सभाग्रहात परिसंवाद, कवी कट्टा सुरू असताना खुर्च्यांची संख्या अधिक रिकामी असल्याचे दिसून आले. मात्र कुसुमाग्रज नगरीच्या पलीकडे करण्यात आलेल्या पार्किंग सुविधेत मोठ्या प्रमाणावरती चार चाकी वाहनांची गर्दी दिसून आली. हे संमेलन आर्थिक दृष्ट्या श्रीमंत असलेल्या रसिकांसाठी लाभाचे ठरल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. संमेलन स्थळी विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय होती.

निमंत्रितांचे कविसंमेलन वाजले दीड

संमेलनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी आठ वाजता नियोजित निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष कविसंमेलन सुरू होण्यास सुमारे दहा वाजले आणि संपायला रात्रीचे दीड वाजले होते.कवी संमेलनात सुमारे 54 कवींचा सहभाग होता. जशी जशी रात्र उलटत होती तसे कवींनीही काढता पाय घेतला , त्यामुळे निमंत्रित असलेल्या कवीही कविता सादर करू शकले नाही.तर सभागृह कविता ऐकण्यासाठी फारच अल्प प्रमाणात गर्दी असल्याचे चित्र समोर आले आहे . समोर प्रेक्षकांची गर्दी नसल्याने कविता सादर करणाऱ्या केली नाही आपल्या उत्साहाला आवरते घ्यावे लागले. कवी संमेलन निमंत्रितांचे असूनही रसिकांना मात्र उत्तम दर्जाच्या कविता ऐकल्यास मिळाल्या नाहीत ,मात्र संजय चौधरी यांचे बहारदार सूत्रसंचालन टाळ्या मिळवून गेले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com