Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसंमेलनाच्या स्मरणिकेतून निधी जमवणार

संमेलनाच्या स्मरणिकेतून निधी जमवणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अंदाजपत्रक वाढत चालल्याने संयोजकांनी आता संमेलनानिमित्त प्रकाशित केल्या जाणार्‍या आकर्षक स्मरणिकेच्या जाहिरातीतून जवळपास अर्धा ते पाऊण कोटींचा निधी जमविण्याची तयारी सुरू केली आहे. संमेलनानिमित्त सुमारे तीन हजार स्मरणिकांची छपाई केली जाणार आहे. जाहिरातीच्या दरपत्रकावर नजर टाकल्यास यातून मोठा निधी जमविण्याचा संयोजकांचा मानस आहे.

- Advertisement -

करोनाच्या नियमांचे पालन करून संमेलन आयोजित करावयाचे असल्याने दैनंदिन स्वच्छता, सुरक्षित अंतराचे पथ्य आणि आरोग्य या विषयावर विशेषत्वाने भर द्यावा लागणार आहे. यामुळे संमेलनाच्या खर्चात वाढ होणार असताना संमेलनात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांची संख्या देखील वाढत आहे. पर्यायाने त्यांची निवास, भोजन आणि वाहतुकीची जबाबदारी संयोजकांना पेलावी लागणार आहे.

मुख्य सभामंडपाची जागा बदलल्याने आता विस्तीर्ण मैदानावर आकाराने मोठा सभामंडप उभारावा लागणार आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध पातळीवरून निधी संकलनाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यामध्ये संमेलनानिमित्त प्रकाशित केल्या जाणार्‍या स्मरणिकेच्या जाहिरातीतून भरीव निधी जमविण्याचा प्रयत्न आहे. स्मरणिका निर्मितीसाठी 14 जणांचा समावेश असलेली संपादकीय-जाहिरात समिती स्थापन करण्यात आली आहे.

मलपृष्ठावरील जाहिरातीसाठी 15 लाख रुपये, स्मरणिका आतील चार पानांसाठी प्रत्येकी 10 लाख (एकूण 40 लाख), पूर्ण पान रंगीत तीन लाख, अर्ध पान रंगीत दीड लाख, पाव पान रंगीत 75 हजार, साधी जाहिरात पूर्ण पान एक लाख रुपये, अर्ध पान 50 हजार, पाव पान 25 हजार, केवळ शुभेच्छा पट्टीसाठी 10 हजार रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

बोलीभाषेवर चर्चासत्र असावे : डॉ. देसाई

नियोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोली भाषेवर चर्चासत्र असावे, अशी मागणी ब्रह्मा व्हॅलीचे संचालक डॉ. बापूराव देसाई यांनी केली आहे. कर्‍हाड येथे झालेल्या साहित्य संमेलनात मराठी भाषेतील लेखक ग. ना. जोगळेकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील बोलीभाषांवर चर्चासत्र ठेवले होते.

यामुळे नाशिकमध्ये होणार्‍या संमेलनात मराठीतील बोलीभाषांवर एक संमेलन ठेवण्यात यावे. उत्तर महाराष्ट्रात 28 बोलीभाषा आहेत. त्यात अहिराणी, लेवा पाटीदार, भिली, गुजरी, मावची, बेलदारी, परदेशी, चांभारी, राजपूत, बागलणी, धनगर, वंजारी यांचा समावेश आहे. तसेच या बोलीभाषा बोलणारा वर्ग उत्तर महाराष्ट्रात मोठा आहे. यामुळे या विषयावर चर्चासत्र ठेवल्यास त्याचा फायदा सर्वांना होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या