Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसंमेलनासाठी निधी उपलब्ध होणार

संमेलनासाठी निधी उपलब्ध होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जिल्ह्यातील 18 आमदारांच्या निधीतून 90 लाखांची मदत मिळण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केले आहे. संमेलनासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक कोटी 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमेलनासाठी 50 लाखांचे अनुदान जाहीर केल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून संमेलनासाठी मदत करावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार शहर आणि जिल्ह्यातील विधानसभासह विधान परिषदेच्या अशा एकूण 18 आमदारांनी संमेलनासाठी निधी देण्याचे पत्र दिले होते.

साहित्य संमेलनाला सरकारकडून भरघोस निधी मिळणार अशी अपेक्षा होती; परंतु आता सरकारने आमदारांच्या निधीला कात्री लावली असून, दहा लाखांऐवजी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

हा सर्व निधी 1 कोटी 65 लाख इतका झाला होता. त्यात सरकारचे 50 लाख असे मिळून दोन कोटी पंधरा लाखांचा सरकारी निधी प्राप्त होणार होता; परंतु आमदारांच्या वतीने देण्यात येणार्‍या एक कोटी 65 लाखांच्या निधीला शासनाने कात्री लावली आहे. यापैकी आता 90 लाख रुपये मिळणार आहेत. यामुळे आयोजकांना 75 लाख रुपये कमी पडणार आहेत. तर नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून संमेलनासाठी 25 लाखांची मदत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संमेलन मे महिन्याच्या शेवटी?

संमेलन करोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिनाअखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा विचार आयोजक करत असल्याचे समजते आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन पुढे ढकलावे अथवा ऑनलाइन पद्धतीने घ्यावे, असा सूर साहित्यिक आणि नाशिककरांकडून आळवला जात आहे. बाहेरून येणार्‍यांकडून करोनाचा फैलाव होऊ शकतो. सध्या मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार वाढत आहे. त्यासाठी आयोजकांनी सावध भूमिका घेण्याचे ठरविले आहे. संमेलनाच्या कार्यालयातील हालचालीदेखील मंदावल्या आहेत.

स्टॉलसाठी प्रतिसाद

संमेलनात ग्रंथ प्रदर्शन हे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर गाळ्यांची आखणी व रचना केलेली आहे. या प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागात मिळून 80 प्रकाशक व पुस्तक विक्रेते यांनी मिळून 121 गाळे आजपर्यंत आरक्षित केले आहेत. प्रत्येक गाळ्यासाठी जीएसटीसह रुपये 6500/- असे शुल्क असून ग्रंथ प्रदर्शनासाठी स्टॉल बुकिंग करण्याची अंतिम मुदत दिनांक 15 मार्च 2021 अशी आहे. दिनांक 25 मार्च रोजी लॉटरी पद्धतीने या गाळ्यांचे वाटप होणार आहे. एका व्यक्तीस / संस्थेस जास्तीत जास्त चारच गाळे मिळणार आहेत.

उद्घाटक जब्बार पटेल की जावेद अख्तर?

स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांना करोनाची लागण झाल्याने ते उपचारासाठी मुंबईला गेले होते. करोनाविषयक चाचणी सोमवारी (दि. 8) केली जाणार आहे. ती निगेटिव्ह आल्यानंतर वैद्यकीयदृष्ट्या फीट झाल्यावर भुजबळ हे कामकाजाला सुरुवात करतील, अशी माहिती समजते. सोबतच संमेलनाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, गीतकार जावेद अख्तर आदींच्या नावावर विचारविनिमय करण्यात आला आहे. त्यामुळे संमेलनाचे उद्घाटक नेमके कोण असतील? याविषयीचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या