मराठी साहित्यात नगरच्या साहित्याचे योगदान ललामभूत

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – महानुभाव पंथाचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, संत चरित्राचे चरित्रकार महीपती महाराज यांनी दिलेले मराठीचे साहित्यातील योगदान ललामभूत असेच आहे. नगर जिल्ह्यात मराठीसोबतच हिंदी, ख्रिस्ती, मुस्लीम, दलित, सिंधी साहित्याची निर्मिती झाली. या साहित्यातून वेगळे विचारप्रवाह सुरू झाले. दलित साहित्याला या जिल्ह्यातूनच धग मिळाली, असा सूर नगर जिल्ह्याचे साहित्यातील योगदान या चर्चासत्रातून निघाला.
विभागीय साहित्य संमेलनात सायंकाळी परिसंवाद झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ. लीला गोविलकर होत्या. प्राचार्य खासेराव शितोळे प्राचार्य अनिल सहस्रबुद्धे, लहू कानडे, डॉ. मेधा काळे, कैलास दौंड याचा सहभाग होता. चर्चासत्रात प्रारंभी दौंड यांनी नगर जिल्ह्यातील साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाची सविस्तर माहिती दिली. गाथासप्तशती पासून लीळाचरीत्र, ज्ञानेश्वरी पर्यंतचा आढावा घेतला. कानडे यांनी संत महीपती महाराज यांनी 125 संतांची चरित्रे शब्धबद्ध केल्याची माहिती दिली.
संत साहित्याचे अभ्यासकही त्यांच्या या चरित्राचा अभ्यास करतात. बहुजन समाजाला त्यांच्या साहित्याने प्रेरणा दिली. खिस्ती धर्म उपदेशकांनी ज्ञानोदयच्या माध्यमातून साहित्य आणि साहित्यिक निर्माण केले. या नियतकालिकाने केवळ धर्मप्रचार न करता साहित्यासाठी वातावरण निर्मिती केली. मुकुंदराव पाटलांनी कुळकर्णी लीळामृत हे पहिले खंडकाव्य लिहिले. मात्र साहित्यिक इतिहासकारांनी त्यांची तशी नोंद केली नाही.
डॉ. मेधाताई काळे यांनी लीळाचरीत्रातील प्रसंग कर्जत, जामखेड, पाथर्डी नगर तालुक्यातील असल्याचे स्पष्ट केले. या परिसरात चक्रधर स्वामींचा रहिवास होता. शेख महमंद महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून साहित्याची निर्मिती केली. साहित्याला कोणतीही जात, धर्म नसल्याचे शेख महमंद यांनी दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. नेहरूंचा डिस्कव्हरी ऑफ इंडिया, गावगाडा याच नगर जिल्ह्यात तयार झाले. साहित्यासोबतच पुरस्कार देणार्‍या संस्थांमुळे मराठी साहित्याच्या चळवळीला गती मिळाली.
डॉ. सहस्रबुद्धे यांनी नगर जिल्हा ही गंगोत्री असल्याचे नमूद केले. येथील साहित्याने विचारासोबत परिवर्तनाची दिशा दिली. नगरने सर्वंकष योगदान दिल्याचे त्यांनी सप्रमाण सांगितले. प्राचार्य शितोळे यांनी महानुभाव पंथाच्या लेखकांना 24 सांकेतिक भाषांतील ग्रंथनिर्मिती संशोधकांना खुणावत आहेत. असे तब्बल साडेसहा हजार ग्रंथ आहेत. त्याची उकल होण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ.लीला गोविलकर यांनी गोदाकाठावरील साहित्याचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

*