चहावेळा…

0

‘कभी कभी मेरे दिल मे, खयाल आता हे…’ हे रेडिओवरचं गाणं सुरू झालं आणि माझं मन अलगद माझ्या पूर्वायुष्यात गेलं…

आठवले ते दिवस जेव्हा ती म्हणजे माझी सौ आणि मी सायंकाळी ठीक पाच वाजता गणपतबाबांच्या रेस्टॉरंटवर भेटायचो. तिची शाळा ठीक चार वाजता सुटायची,  साडेचारपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करून शाळा बंद करण्याची जबाबदारी ती फार नेटाने पार पाडायची;  आणि साधारण पावणे पाच ते पाच पर्यंत ती रेस्टॉरंटवर पोहचायची. मी माझे कंपनीतले काम आटोपून सर्व मित्रमंडळींना लवकर फाटा देऊन रेस्टॉरंटला पोहचायचो. कधी कधी उशीर व्हायचा तेव्हा ती रेस्टॉरंटच्या बाहेर रस्त्याच्या कडेला हाताची घडी घालून वाट बघायची अर्थात चेहऱ्यावर लटका राग असायचाच, पण का कुणास ठाऊक,  मलाही तिचा लटका राग बघण्याचा योग जुळवून आणण्याकरिता मुद्दाम विलंब करावासा वाटायचा…अन मग तो राग मनविण्यासाठी गणपतबाबांचा चहा आणि तिला आपुलकीने विचारलेला एक प्रश्न, “काय मग सरकार, कसा होता आजचा दिवस?” या दोन गोष्टी पुरेशा असायच्या.

मग सरकार या शब्दावरून ती तिची हुकूमत गाजवायची. अर्थात मलाही तेच हवे असायचे. तोवर चहा आलेला असायचा मग तो गरमागरम वाफाळलेला चहाचा कप हाती घेऊन दिवसभर घडलेल्या गोष्टी माझ्यापुढे मांडायची. कधी हसायची, कधी आवाजाचा स्तर वाढवून बोलायची. तिच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली एखादी कलाकृती फार कौतुकाने सांगायची. टिपिकल शिक्षकी पेशा असलेली माझी बायको घरातील सर्व गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायची.

तसं आमचं घर खटल्याचं होतं. घरात माझे दोन भाऊ,  त्यांच्या बायका,  त्यांची मुलं असा राबता असायचा. आम्ही घरात थोरले होतो. थोरले म्हटल्यावर त्याग आणि जबाबदारी या दोन गोष्टी आम्ही प्राधान्याने स्वीकारल्या होत्या. त्यात तिने कधी काही गाऱ्हाणी केली आहे असं मला आठवून आठवून सुद्धा आठवणार नाही. आमच्या सुखी कुटुंबाला फक्त एकाच गोष्टीची कमी होती. ते म्हणजे अपत्य; परंतु भावांची मुलं ती आपलीच मुलं हा जणू नियमच आम्ही स्वतःला घालून घेऊन येणाऱ्या उद्याची वाटचाल करायचो.

खटल्याच्या घरात एकांत मिळणे कठीण म्हणून आम्ही न ठरवताच गणपतबाबांचा चहा आमच्या भेटीचा सुवर्णमध्य झाला होता;   आणि रोजनुसार गणपतबाबांना देखील आमची सवयच झालेली होती आमची.

चहा झाल्यावर बिल कोणी द्यायचे? तर हसून आणि हक्काने तिचे वाक्य असायचे, “आज तुम्ही द्या, उद्या मी देईन.”तिच्या उद्याची मी अजूनही वाट बघतोय. उभ्या आयुष्यात माझ्याच काय पण संपूर्ण कुटुंबाच्या उद्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणारी माझी बायको मनाने फार भक्कम होती.

बिल दिल्यावर ती रस्त्यात थांबायची..अन मग मी माझी जुनी एमएटी  घेऊन यायचो…मोजून तिसऱ्या किक मध्ये ती सुरू व्हायची. ती मागे बसल्यावर तिचा हात अलगद माझ्या खांद्यावर ठेवून बसल्याची जाणीव करून द्यायची. मग आम्ही निघायचो…

…. के जैसे तुझको बनाया गया ही है मेरे लिये…’ असं काहीतरी ऐकू आले आणि मी पूर्व आयुष्यातील आठवणींमधून वर्तमानात आलो.

थोडं स्वतःशीच हसलो… तेवढ्यात एक पंचविशीतील युवक समोर आला.

येताना स्वतःशीच बोलत होता..‘वॉट अ रास्कल पीपल…कोणालाच वेळेची काळजी नाही..’ वगैरे वगैरे…आमची नजरानजर झाली..अन मला उद्देशून म्हणाला, “ एक्सक्युज मी अंकल,.मी इथे बसू का ?” असं म्हणत बसला सुद्धा !

मला तो जरा कावराबावरा, थोडासा चिडलेला वाटला..ऐन पंचविशीचा, उंचपुरा, गोरापान.. केस एकदम स्टाईलबाज, अंगात आत टी-शर्ट त्यावर सदरा, सदऱ्याचे दोन बटन उघडे आणि जीन्स… त्यासोबत कानात ते हल्लीच्या पोरांचं मंगळसूत्र (हेडफोन) असलेला तो मला अगतिकतेने म्हणाला, “ काका आता काय म्हणायचं याला… वेळ देऊन सुद्धा लोक वेळेवर येत नाही. वेळेची काही कदरच नाही..बर  त्यांच्या नाही तर नाही पण माझं काय..?”

“चहा…चहा घेणार का?”  मध्येच त्याचं बोलणं तोडत थोडा स्वर उंचावतच त्याला विचारलं.

“अं..” हे असं अनपेक्षित चहाचं विचारणं कसं काय झालं असा चेहरा करत त्याने “हो हो घेतो की.. दोन चहा दे रे” असं म्हणत चहाची ऑर्डर पण देऊन टाकली.

मग थोड शांत होत मोकळा बोलायला लागला.. “किती वेळ करते ही.. अजिबात वेळेचं भान नाही.”

“घे, चहा घे..” अस म्हणून चहाचा कप त्याच्याकडे सरकवला.. “…आणि येईल रे, रस्त्यात कुठे अडकली असेल.”

माझे आश्वासनाचे चार शब्द ऐकून अजून शांत झाल्यागत बोलायला सुरुवात केली. “काका, माझी प्रेयसी..तशी फार प्रेमळ अन समजूतदार आहे हो..”

मी देखील त्याच्या सुरात सूर मिळवत“हं… तरी मला वाटलंच.. किती रे वैतागतो आहेस.. तू नाही करत का कधी उशीर..?”

“तसं मीही उशीर करतोच म्हणा..” जरा शरमल्यागत त्याने उत्तर दिलं.. “पण आता समजतंय, ती किती संयमी आहे ते..”

चहाचा फुरका मारत त्याला बोलतं करायच्या हेतूने मी विचारले.. “मग काय भेटल्यावर नुसतं भांडतच राहतात कि काय तुम्ही..”

चहाचा घोट घेत तो बोलला, “छे हो काका, तसं नाही. मी चिडतो पण मग तीच फार प्रेमाने म्हणते, “ आता भांडतंच रहायचं कि दुसरं काही बोलायचं पण..”  मग माझा राग त्या वाक्याने विरघळून जातो अन्‌ मग आम्ही बोलतच राहतो. आता आज पण तिला उशीर झालाय…मग तिला डिवचून देतो आणि तिचा तो नाकाच्या शेंड्यावरचा लटका राग बघण्याचा योग कसा जुळवून आणतो बघा..”

ह्या युगातलं प्रेम ऐकून नाजुकशी हास्याची किनार माझ्या चेहऱ्यावर आली आणि ह्या पठ्ठ्याने ती नजरेत पकडली सुद्धा.. “व्वा रे तुमच्या युगातल प्रेम..”असं मी म्हटलं अन्‌ लगेच त्याने थोडसं घाबरून विचारलं.. “काका, एक विचारू?”

“अरे विचार की, तस मलाही समजलंय तुला काय विचारायचं आहे..पण तरीही तूच विचार” थोडस गमतीने त्याला बोललो.

आश्चर्याने त्याने विचारले, “ सांगा मग मला काय विचारायचे आहे..?”

एव्हाना दोघांचे चहाचे कप रिते झाले होते.. त्याची उत्सुकता बघून मी अजून वन बाय टू चहा सांगितला.. “घे, चहा घे.. सांगतो तुला काय विचारायचे आहे..”

चहाचा कप हातात घेत.. “घेतो, पण तुम्ही सांगा.”

“अरे बाळा, तुला आमच्या युगातलं प्रेम जाणून घ्यायचं असणार दुसरं काय? ’’ चहाचा घोट घेत त्याच्या नजरेत नजर मिळवत मी म्हणालो.

माझ वाक्य ऐकल्यावर आश्चर्याने डोळे मोठे करत म्हणाला, “ अरेच्या, तुम्हाला कसं समजलं?”

“हाहाहा.. अरे उगाच माझ्या डोक्यावरचे पांढरे झालेत का?”

“हं”..सांगा न काका तुमच्या काळातल्या प्रेमाबद्दल..

गंभीर होत मी सुरुवात केली.. “ आमच्या काळात, आमच्या युगात प्रेम म्हणजे नक्की काय हेच समजत नव्हतं. आजकाल प्रेम आधी होतं, मग टिकलं तर लग्न नाही तर थांबलं.. आमच्या वेळी न टेलिफोन,  ना मोबाईल,  मेसेज आणि व्हॉटस्प तर फार लांबची गोष्ट.. आमचं विश्व फार छोटं असायचं..पण विश्वासामुळे इतकं पक्क असायचं की, पानिपतामधून स्वतः विश्वासराव जिवंत होतील..हाहाहा.  आजच्या मुलांना काय माहिती पानिपत आणि कोण विश्वासराव…तुला तरी माहितीये का कोण विश्वासराव आणि काय पानिपत?”

थोडा इगो दुखावल्यागत त्याने प्रत्युत्तर केलं.. “अर्थातच माहीत असणार. पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरा असलेल्या पुण्याचा आहे मी..”

“अच्छा, म्हणजे तू पुण्याचा तर..” चहा घेत मी बोललो.

मोबाईलकडे बघत तो उत्तरला “हो.. इतक्या लांबून आलो हिला भेटायला तर हिचा पत्ताच नाही..”

“हो ना ते समजतंय कि, सारखा मोबाईल चालू बंद करतोय, तिला मेसेज करतोय..”असं म्हणत जुन्या युगातल्या प्रेमाबद्दल मी बोलायला लागलो.. “ बरं का.. आमच्या काळात भेट पाच वाजेला ठरली कि आम्ही पाच वाजायला पाच मिनिटे कमी असतानाच पोहचायचो..”

मध्येच बोलणं तोडत तो म्हणाला,“आयला.. एवढ टाईम टू टाईम.”

“तेच तर सांगतोय मी, आमची दुनियाच फार छोटी असायची.. माझ विश्व ती आणि तीच विश्व मी.” असं म्हणून यावर त्याची प्रतिक्रिया काय हे बघत होतो मी.

“मग, तुमच्या वेळी संपर्क माध्यम काय?” फारच जिज्ञासू वृत्तीने त्याने प्रश्न केला.

मी पण बारीक हास्याने.. “तसं संपर्क माध्यम म्हणजे आमची आधीची भेट.. त्याच वेळी पुढची भेट कधी हे ठरवून टाकायचो.”

“काका, अं… तुमच्या वेळी सुद्धा प्रेमाचं कन्फर्मेशन – आय लव्ह यू-  म्हणूनच व्हायचं का..?” या प्रश्नाने जणू काही आमच्या संभाषणाला मुलाखतीच रूप आल्याच मला जाणवलं. ही मुलाखत म्हणजे एका युगाचं दुसऱ्या युगातील प्रेमाची तुलना असावी..

उत्तरादाखल मी बोललो, “ अरे मित्रा, कसलं आय लव्ह यू अन कसलं काय.. खरं प्रेम हे नजरेतूनचं समजत…पण ते प्रेम समजायलाही आपली नजर खरी आणि कोरी असायला हवी.”

एवढं बोलतो न बोलतो तोच त्याचा फोन खणाणला…

हॅलो काय गं..? कुठे पोहोचलीस?..”

“बरं ठीक आहे.. थांब तिथेच मी पोहोचतोच..”

“कोण मी..? काही झालेलं नाहीये..पोहचतो मी आणि ऐक न..लव्ह यू !

खिशात फोन ठेवत तो म्हणाला “काका, ती विचारत होती.. अचानक इतका शांत आणि प्रेमळ आवाज कसा?”  हाहाहा..

चहाचा शेवटचा घोट घेत घेत तो म्हणाला, “काका,  ॲक्युअली मला निघायला हवं. फार छान वाटलं बोलून..पुन्हा केव्हा भेट होईल?”

काही खोटं उत्तर द्यायचा विचार करत होतो तेव्हा अचानक माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले’ “ अरे बाळा, जा जा आधीच उशीर झालाय.. मी रोज पाच वाजता इथेच असतो.”

“अच्छा काका, निघतो मी..” असं म्हणत तो चार पावलं पुढे गेला नि मागे वळून खिशातून मोबाईल काढत माझ्याकडे आला..अन म्हणाला, “ काका, फोटो बघा न आमच्या जोडीचा..”

“अरे कशाला…”असं म्हणत असताना त्याने तो मोबाईल फोटो ओपन करून माझ्यासमोर पकडला सुद्धा…

“छान आहे हं जोडा. लक्ष्मीनारायणासारखा.. फारच सुरेख.. नशीबवान आहेस..” असं म्हणत मी फोन त्याच्याकडे दिला.

“धन्यवाद काका, मी निघतो..”

तो गेला.. मी मनातच हसलो अन अजून एक चहाची ऑर्डर देऊन मनाशीच बोलायला सुरुवात केली.. फार नशीबवान आहे हा मुलगा.. खूप कमी लोकांना मिळतो असा दागिना.. मुलीचे डोळे फार आश्वासक होते..तिच्या गालावरची खळी तीच नाजूक सौंदर्य खुलवत होती. आणि त्या खळीची नाजूक मोहोर तिच्या गव्हाळ वर्णावर उमटली होती. दोघांच्या नजरेतून त्यांच्या अतूट नात्यातलं प्रेम स्पष्ट दिसत होतं..

माझी सौ.. अशीच गव्हाळ वर्णाची होती. तिच्याही गालावर मस्त खळी असायची. फारच सुंदर.. संसार फार सुरेख झाला आमचा. तसं आम्हाला संकटांची कमी नव्हती. एक झालं कि एक… पण आम्ही दोघांनी सगळे संकट लिलया पार केले;  अन्‌ हसून जीवन जगलो. मी कधी निराश झालो तर ती म्हणायची,  “मी आहे ना..अन कराल तुम्ही..मला माहितीये..”बस्स.. आणि हे ऐकून मी देखील कुठल्याही संकटासमोर बारा हत्तींच बळ घेऊन उभं रहायचो.

माझ्या थोड्या रागीट स्वभावामुळे ती बऱ्याच वेळा नाराज व्हायची पण तिने कधी चार चौघात बोलून दाखवल नाही कि नाराज झाली म्हणून कुठली जबाबदारी घेणं टाळणं असही केलं नाही.

असंच जीवन होतं आमचं..

तिला जाऊन आता तीन वर्षे झालीत. अगदी अचानकच सोडून गेली ती..अर्ध्यावरतीच डाव मोडला तिने… मी तर तेव्हा अगदी कावराबावरा झालो होतो. कारण माझं आयुष्य असलेली ती मला क्षणात सोडून गेलेली होती. ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थ तिनेच तर समजवला आणि जगायला शिकवला होता तिने..  पण जाताना मात्र संपूर्ण घराचा आधार म्हणून उभं राहण्याचा शब्द घेऊन गेली होती… म्हणून आजही वडासारखा उभा आहे मी ती नसलेल्या माझ्या कुटुंबात…तिच्याचसाठी..

पण पाच वाजेची वेळ मात्र फक्त तिच्याच साठी राखून ठेवलीये. रोज पाच वाजता गणपत बाबांच्या हॉटेल वर यायचं..चहा घ्यायचा..तिच्या आठवणींमध्ये मनसोक्त डुंबायचं.. हसायचं.. बस्स..

गेल्या तीन वर्षात बरचसं बदललं. गणपतबाबा गेले.. रेस्टॉरंटच हॉटेल झालं. मात्र चहाची चव..पाच वाजेची रेडिओवरची गाणी आणि तिच्या आठवणी नाही बदलल्या.

एव्हाना चहाचा अडीचवा कप देखील संपला होता. बिल दिलं.. आणि आभाळाकडे नजर टाकली. मस्त तांबूस रंग घेऊन आभाळ नटलं होत. सांज खुलली होती. वाराही मस्त सुटला होता. झाडे झळझळ आवाज करत वाऱ्याला प्रतिसाद देत होती.  गाडीकडे पोहचलो. गाडी काढली.. आज गाडी मोजून तिसऱ्या किक मध्ये सुरू झाली… पुढे निघणार तोच अलगद खांद्यावर काहीतरी जड झाल्यासारखं वाटलं… भास असेल.. छे भास कसला.. जणू काही तिनेच अलगद हात ठेवला असावा माझ्या डाव्या खांद्यावर.. म्हणून चमकून मागे थोडी मान तिरकी करून नजर पूर्ण फिरवून बघितले तर कोणीच नव्हते..क्षणाचाही विलंब न करता माझ्या नजरेने खांद्याचा वेध घेतला.. बघतो तर काय… झाडाचं एक पान गळून नेमकं त्याच खांद्यावर पडलं होतं..

झाडाकडे बघितलं.. वारा सुटल्याने मस्त सळसळ करत होतं. आणि आज इतक्या वर्षानंतर मला डॉ.जगदीशचंद्र बोस यांचा सिद्धांत खरा जाणवला… “वृक्षांनाही भावना असतात…!!”

  • वैभव सुरेश कातकाडे (katkade.vaibhav04@gmail.com)

LEAVE A REPLY

*