Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मराठी अभिनेत्री अदिती गोवित्रीकर हिच्याशी संवाद

Share

अभिनेत्री अदिती गोवित्रीकर हिच्याशी साधलेला मनमोकळा संवाद.

मॉडेलिंग, जाहिरात,अल्बम, बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर मराठी चित्रपटाकडे कशी वळलीस ?

मला सुरुवातीपासूनच मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करायचा होता आणि माझी ही इच्छा मी अनेकदा व्यक्तही केली आहे. मात्र कदाचित लोकांना असा गैरसमज असावा, की मी मराठी बोलू शकत नाही किंवा मग मला मराठीत काम करण्यात रस नाही. ज्यात काहीच तथ्य नाही.

अखेर माझी ही इच्छा संजय जाधवच्या ‘रिंगा रिंगा’ चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण झाली. यात माझी अगदीच छोटी भूमिका होती. तरी त्या निमित्तानं माझं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झालं. त्यानंतर मी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या चित्रपटातही छोटीशी भूमिका साकारली. आणि आता लवकरच विक्रम फडणीसच्या ‘स्माईल प्लीज’मधून मी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘स्माईल प्लीज’ मधील भूमिका कशी मिळाली?

खरं सांगायचं तर मी आणि विक्रम अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. ज्यावेळी त्याने त्याचा पहिला चित्रपट ‘हृदयांतर’ प्रदर्शित केला होता तेव्हापासूनच मला असं वाटतं होतं, की भविष्यात एकदा तरी विक्रमच्या चित्रपटात एखादी व्यक्तिरेखा आपल्याला साकारायला मिळावी आणि माझी ही इच्छा ‘स्माईल प्लीज’च्या निमित्तानं पूर्ण झाली.

या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी?

या चित्रपटातील माझ्या भूमिकेविषयी आताच जास्त काही सांगणार नाही. परंतु या चित्रपटात मी एका डॉक्टरची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत मी डॉक्टरची भूमिका कधीच साकारली नव्हती. ही भूमिका साकारताना मी रिअल लाईफमध्ये डॉक्टर असल्याचा फायदा नक्कीच झाला. त्यामुळे या भूमिकेत मला जास्त जिवंतपणा आणता आला.

दिग्दर्शक विक्रम फडणीससोबत काम करण्याचा अनुभव?

मी माझ्या मॉडेलिंगच्या काळापासून विक्रमला ओळखते. म्हणजे सुमारे वीस वर्षांपासून. सुरुवातीला त्याने मला रॅम्पवॉकचे ट्रेनिंगही दिले होते. त्याच्या सान्निध्यात मला खूप काही शिकता आले. त्यामुळे विक्रमच्या कामाची पद्धत मला माहित आहे. प्रत्येक कामाला तो शंभर टक्के न्याय देतो.

असा त्याचा अट्टाहासच असतो म्हणा. आणि त्यामुळेच त्याचे काम उत्कृष्ट होते. त्याची शिकण्याची वृत्ती असल्यानं तो सतत काहीतरी नवीन जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. त्याला काय हवं आहे, हे त्याच्या डोक्यात पक्के असल्यामुळे त्याला अपेक्षित रिझल्ट मिळेपर्यंत तो समोरच्याकडून काम करून घेतो. म्हणूनच मॉडेलिंग आणि अभिनय या दोन्ही ठिकाणी त्याच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव अप्रतिम आहे.

नाटक, वेबसिरीजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

हो नक्कीच. नाटकात काम करायला मला निश्चितच आवडेल. वेबसिरीजच्या शोधात तर मी आहेच. यापूर्वी मी झी फाईव्हवरील ‘परछाई’ या वेबसिरीजमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे आणखीन वेबसिरीजमध्ये नक्कीच काम करायचं आहे.

भूमिका निवडताना कशाला प्राधान्य देतेस?

भूमिका निवडताना माझ्या खूप काही अटी नसतात. त्या भूमिकेविषयी ऐकतानाच किंवा वाचताक्षणीच ती भूमिका मनाला भावली पाहिजे. अशी भूमिका असेल तर मी त्याला त्वरित होकार देते. साहजिकच दिग्दर्शक, सहकलाकार, निर्माता या गोष्टींनाही प्राधान्य देतेच.

भविष्यात कशा प्रकारची भूमिका साकारायची आहे?

मला आव्हानात्मक भूमिका करायला नक्कीच आवडेल. माझ्या स्वभावाच्या विरुद्ध अशी भूमिका मला साकारायची आहे. त्यामुळे एखादी ग्रे शेड, नकारात्मक भूमिका करण्याची माझी इच्छा आहे.

पुढील प्रोजेक्ट?

‘कोई जाने ना’ या चित्रपटातील एका गाण्यातून मी प्रेक्षकांच्या भेटीला येईन. आणि सध्या मी अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून सायकोलॉजीमध्ये मास्टर्स करत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!