आर्थिक निकषावर मराठा आरक्षण द्यावे

0

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – 50 टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असले तरी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संसदेत ठराव करून तो एकमताने मंजूर केला पाहिजे. संसद ही सर्वोच्च न्यायालयापेक्षा सुप्रिम आहे. आरक्षणात संसदेने 25 टक्के वाढ करून 16 टक्के आरक्षण मराठा समाजास द्यावे.

उर्वरित 9 टक्के अन्य मागणी करणार्‍या समाजास दिले पाहिजे. मराठी समाजास आरक्षण देताना ते आर्थिक निकषावर असावे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी न्यायालयात जो मसुदा मांडला आहे तो टिकेल की नाही अशी शंकाही त्यांनी वर्तविली.
बुधवारी (दि.28) आठवले यांनी घेतलेल्या जिल्हा आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, रिपाईचे अशोक गायकवाड, अजय साळवे, अशोक साळवे, दिपक गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आठवले म्हणाले, नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बियाणांसाठी 10 हजार रूपये देण्यास अहमदनगर जिल्हा बँकेने सुरूवात केली आहे. अन्य जिल्हा बँका ही रक्कम देण्यासाठी तयार आहे, मात्र त्यांना आरबीआयचे पत्र आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांना पत्र देण्यात यावे, त्यामुळे शेतकर्‍यांची गैरसोय होणार नाही. त्याकरीता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी बोलणार असल्याचे ते म्हणाले.

कर्जमाफी हा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय आहे. कर्जमाफीचा फायदा गरीब शेतकर्‍यांना झाला पाहिजे. सरकारने पाच एकरची अट घातली आहे. मात्र ज्या शेतकर्‍यांना पाच एकरापेक्षा अधिक जमीन असली तरी ती कोरडवाहू असल्याने त्यांच्यावर हा अन्याय आहे. त्यामुळे ही अट शिथिल करण्यात यावी यासाठी प्रयत्न केले जातील.

शेतकर्‍याच्या मालाला भाव मिळावा यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमण्याची गरज आहे. ही कमिटी योग्य अभ्यास करुन शेतकर्‍याच्या मालाचे मुल्यमापन करेल अशी योजना करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहे. नगर जिल्ह्यात ज्या ठिकाणी कापुस उत्पादन घेतले जाते त्या भागात कापड गिरण्या, कारखाने उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

तसेच कर्जत तालुक्यात 109 कोटीचे वसतीगृह व सामाजिक न्यायभवन मंजुर झाले आहे. मात्र तेथे जागेचा आभाव असल्यामुळे त्याचे नियोजन सुरू आहे. नगर शहरातील सावेडी भागातील अडीच एकर जागेवरील सामाजिक न्यायभवनाच्या बांधकामाला रस्त्याची समस्या आली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यातून योग्य मार्ग काढण्यात येणार आहे असल्याचे आठवले म्हणाले.
……………………
ठाकरेंनी श्रेय घ्यावे, पण सत्तेत रहावे –
राज्यात मध्यावधी निवडणुकांचे वारे वाहत असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, तसे काही नाही. राज्य व केंद्र सरकार पाच वर्षे स्थिर राहणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचे श्रेय घ्यावे मात्र सरकारमधून बाहेर पडू नये. पाठिंबा काढला तरी राज्य व केंद्र सरकार पडणार नाही. तसेच राष्ट्रपती निवडणुकीत मिरा कुमारी यांना बळीचा बकरा करण्यात आला आहे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. दलित उमेदवार दिल्यानंतर कॉग्रेसने दलित उमेदवार देण्यासाठी मीरा कुमार यांना पुढे केले आहे. प्रकाश आंबेडकरांना ऐक्य करायचे असेल तर माझे मंत्रीपदाचे दोन वर्षे बाकी आहे. त्यानंतर ऐक्याचा विचार करु असे आठवले म्हणाले.
—————
महामंडळाचे कर्जमाफीसाठी प्रयत्न –
महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, वसंतराव नाईक, अदिवासी विकास महामंडळाचे सहाशे कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. ते माफ करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मात्र कर्ज घेणार्‍याने कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, कर्ज घेऊन सक्षम झाले पाहिजे. तसे होताना दिसत नाही, या कर्जाचा विनियोग अन्य कामांसाठी केला जात असल्याची खंत आठवले यांनी व्यक्त केली.

आश्रमशाळांच्या चौकशीचे आदेशआश्रमशाळांच्या चौकशीचे आदेश –

‘सार्वमत’मध्ये जिल्ह्यातील समाजकल्याण व आदिवासी एकात्मिक बालविकास अंतर्गत चालणार्‍या आश्रमशाळांची अवस्था मांडण्यात आली होती. यात मुलींचे लैंगिक छळ, भौतिक सुविधा व मुलभूत गरजा यांचे वास्तव मांडले होते. याची दखल घेत समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी नोंद केली असून याची सखोल चौकशी होणार आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

LEAVE A REPLY

*