9 ऑगस्टच्या मराठा महामोर्चातून देणार ‘अल्टीमेटम’

नियोजनासाठी राज्यस्तरीय कोअर कमेटी गठीत : नाशिक पुन्हा एकदा केंद्र

0

नाशिक । 9 ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात येणार्‍या मोर्चातून सरकारला अल्टीमेटम देण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात बोलका मोर्चा काढला जाईल, त्यास सरकार जबाबदार राहील असा इशाराही आज नाशिक येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत देण्यात आला.

दरम्यान आजच्या बैठकीत राज्याची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली असुन यात प्रत्येक जिल्ह्यातील 2 सदस्यांचा समवेश करण्यात आला आहे.

कोपर्डी घटनेनंतर पिडीत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि इतर मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाचे राज्यभरात 58 मोर्चे निघाले होते. तरीही सरकारने मोर्चाच्या मागण्या मान्य केलेल्या नाही. त्यामुळेच आता 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे महामोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज नाशिक येथील औरंगाबादरोडवरील रुक्मिणी लॉन्स येथे मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठक झाली.

यात मुंबई येथील महामोर्चाचा प्राथमिक आराखडा मांडण्यात आला. याबाबत मुंबई पोलिसांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर 24 जुनला जिल्हावार तर 25 जूनला राज्यस्तरीय बैठक होणार असून यानंतर सर्व नियोजन जनतेपर्यत पोहचवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून मराठा समाजाने मोर्चात यावे व याबाबत सुक्ष्म नियोजन करण्यासाठी जिल्ह्याची 5 सदस्यांची कोअर कमिटी निवडण्यात येणार आहे.

जिल्हा कमिटीची निवड झाल्यानंतर तालुकानिहाय कमिटीची निवड करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी राज्यभरातील औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर, पुणो, अमरावती, नागपूर, बुलडाणा, जालना, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा रत्नागिरी, रायगड सिंधूदुर्ग, धुळे अशा विविध जिल्ह्यांमधील मराठा समाजाचे प्रतिनिधीं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नियोजनाविषयी चर्चा करताना मुंबईतील मोर्चासाठी काय व कसे नियोजन करावे यासाठी राज्यभरातील प्रतिनिधींनी आपली मत मांडले. आजवर 57 मोर्च झाले असले तरी मुंबईतील मोर्चा न भूतो न भविष्यती अशा प्रकारे यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

आजच्या बैठकीत मंजुर झालेले महत्वाचे ठराव

मराठा क्रांती मोर्चाचा वापर कोणीही वैयक्तीक स्वार्थासाठी करू नये. गाव, तालुका, जिल्हास्तरावर समित्या स्थापन करून विभागवार निरीक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक तीन दिवसांनी मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यात यावा. प्रत्येक जिल्ह्याची कोर कमिटी स्थापन करून मोर्चाच्या तीन दिवस आधी मुंबईत जाऊन जिल्ह्यातून येणार्‍या वाहने, मोर्चेकर्‍याच्या निवासाचे नियोजन करणे.

राज्यभरातून मुंबईत येणार्‍या वाहनांचे नियोजन करण्यासाठी वाहतूक समिती स्थापन करणे. महिलांच्या सोयीसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करून मुंबईत महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी व निवासस्थानांची सोय करणे. राज्यभरातून येणार्‍या मराठा समाज बांधवांच्या जनजागृतीसाठी एकाचप्रकारचे फलक, झेंडेे, पत्रके, पोस्टर्सचे नियोजन करणे.

मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देण्यासाठी राज्यातील तज्ञ वकिलांची उच्चस्तरीय समिती नेमणे. ग्रामीण भागातील मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी मुंबईतील मराठा समाज बांधवांच्या जनजागृतीसाठी दोन ते तीन दिवस आधी जाऊन जनजागृती करणे. मुंबईत आयोजित मोर्चाचे नियोजन करण्यासाठी व मराठा समाजाच्या मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना करणे.

LEAVE A REPLY

*