मुंबईतील मराठा मोर्चातून सरकारला देणार अल्टीमेटम

0
बोलका मोर्चा काढण्याचा इशारा
नाशिक – मराठा क्रांती मोर्चाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. या अंतर्गत मराठा क्रांती मोर्चासाठी राज्यस्तरीय समित्या नेमण्यात आल्या आहेत. तसेच कोपर्डी येथे येत्या 13 जुलै रोजी मेणबत्ती मोर्चा काढण्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. बैठकीत इतर अनेक महत्त्वाचे ठराव सुद्धा मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, 9 ऑगस्ट रोजी मुंबईत क्रांती मोर्चा काढण्यात येणार असून, त्यात ‘अल्टीमेटम’ देण्यात येणार आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास भविष्यात बोलका मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला असून, त्याची जबाबदारी सरकारवरच असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द व्हावा अशा मागण्यांसाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात येणार्‍या मराठा क्रांती मोर्चासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठीही राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नाशिकमध्ये रविवारी झालेल्या राज्यस्तरीय नियोजन बैठकीत घेण्यात आला. येत्या 13 जुलै रोजी कोपर्डी येथे बलात्कारपीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार आहे. याच वेळी मुंबईतील मोर्चासंबंधी नियोजन बैठक घेण्याचे नाशिकमध्ये ठरविण्यात आले. बैठक तब्बल पाच तास चालली. नाशिकसह नगर, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर आदी परिसरातून क्रांती मोर्चाचे प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला.
बैठकीतील प्रमुख निर्णय
– क्रांती मोर्चा हा 9 ऑगस्ट रोजीच निघणार
– मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार
– गावपातळीपासून ते प्रदेश पातळीपर्यंत स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात येणार
– या समित्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभाग पातळीवर निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार
– स्थानिक समितीचे सदस्य मोर्चापूर्वी तीन दिवस मुंबईत जाऊन नियोजन करणार
– वाहतूक समितीची स्थापना करणार
– महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करणार
– न्यायालयीन लढ्यासाठी 10 तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती करण्यात येईल.

LEAVE A REPLY

*