Type to search

ब्लॉग सार्वमत

मान्सूनची उशिरा वर्दी

Share

पाणीप्रश्‍न बिकट; पेरण्याही लांबणार

एल निनोचा मान्सूनवर परिणाम दिसण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मान्सूनचा अंदाज सरासरीच्या 96 टक्के असा आला असला तरी पाऊस कोणत्या भागात कसा पडतो हे महत्त्वाचे असते. मान्सून 6 जूनला केरळमध्ये दाखल होईल. मुंबईसह राज्यभरात 8-10 जूनला मान्सून दाखल होईल, असा ‘स्कायमेट’ या हवामान संस्थेने वर्तवला आहे. नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच शेतीसह अनेक क्षेत्रांतील घडामोडींना वेग येतो. मान्सूनचा शेती आणि एकूणच अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होत असल्याने संपूर्ण देश त्याच्या आगमानाकडे डोळे लावून बसलेला असतो.

या पार्श्वभूमीवर हवामान शास्त्राचा अभ्यास करणार्‍या स्कायमेट संस्थेने मान्सूनचा प्राथमिक अंदाज दिला आहे. मान्सून लांबण्याच्या अंदाजामुळे शेतकर्‍यांची काळजी वाढली आहे. पेरणीही लांबणीवर पडणार आहे. त्यातच पाण्याचे संकट समोर आहे. लवकर पाऊस झाला तर पाण्याचा आणि चार्‍याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होते. मात्र जून कोरडा जाणार असल्याने शेतकर्‍यांची काळजी आणखी वाढली. पाण्याचे स्त्रोतही कोरडे पडले आहेत. पाऊस लांबल्याने आता पाण्याचाही वापर काटकसरी करावा लागणार आहे.

मान्सून आगमनाची वार्ता शेतकर्‍यांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरते, कारण, मान्सूनला उशीर झाला तर त्याचा परिणाम खरीप हंगामावर होऊ शकतो. दोन पावसांमध्ये मोठा खंड पडला तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येते.

मान्सून आगमनात त्रिवेंद्रम आणि चेन्नईसह तामिळनाडूत पावसाला सुरुवात होईल. मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरातही दाखल होईल. मान्सून 6 जूनपर्यंत कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये सक्रीय होईल. त्यानंतर दिसपूर, आगरताळा, गुवाहटी शिलाँग आणि इंफाळमध्ये हजेरी लावेल.8 – 10 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये दाखल होईल, असा प्राथमिक अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. या प्रवासानंतर मान्सूनची गती थोडी मंदावेल असेही म्हटले आहे.

शासनाने आता तरी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन दखल घेण्याची गरज आहे. अंदाजानुसार मान्सून बरसला तरी होणार्‍या संभाव्य नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी शासनाने सर्व शेतकर्‍यांच्या पिकांना संरक्षण द्यावे. अंदाजानुसार मान्सून बरसला नाही किंवा दोन पावसांच्या मधील अंतर वाढले तर होणार्‍या नुकसान भरपाईला विमा कंपनी जबाबदार असेल, असे शासनाने सांगावे. अलीकडील काळात संकरीकरण झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या घरचे बियाणे ङ्गार कमी असते. त्यामुळे शासनाने बियण्यांची उपलब्धता कायम राहील याची काळजी घेतली पाहिजे.

डोंगराच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत पडणार्‍या पावसाचा प्रत्येक थेंब साठविण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पडणार्‍या पावसाचे पाणी अधिकाधिक साठविण्याची गरज आहे. धरणांतील गाळ उपसा झाल्यास पाणी साठवणुकीची क्षमता 25 टक्यांनी वाढू शकते. मान्सूनपूर्वी हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.
शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र यंदा पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांसह व्यापारी आणि एकूण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे.

शेतकर्‍यांनी शेतीची पावसापूर्वीची मशागत केली आहे. जलस्त्रोतामध्ये पाणी कमी आहे तर काही कोरडे पडले आहेत.पाऊस उशीराने येणार असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आणखी बिकट होणार आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. जनावरांच्या छावण्या सुरू आहेत मात्र एक पाऊस झाला की छावणी बंद होते. एका पावसात चारा लगेच उपलब्ध होत नाही. आणि म्हणून चार्‍यांचाही प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा राहणार आहे. विहिर किंवा बोअरवेलला पाणीही एका पावसावर येत नाही. पिकांची पेरणी तसेच भाजीपाला लागवड उशिरा होणार असल्याने भाजीपालाही उशिरा येईल आणि त्यामुळे भाजीपाल्याचे भावही वाढणार आहेत. या सर्वांचा परिणाम महागाई वाढीवर होणार आहे.

– रावसाहेब पटारे
9689499708

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!