मान्सूसपूर्व पावसाची जिल्ह्यात सर्वदूर हजेरी

0

भंडारदरात 12 तासात 68 दक्षलक्ष घनफूट पाणी
अहमदनगर – राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. भंडारदरा पाणलोटा झालेल्या पावसाने धरणात नवीन पाण्याची आवक झाली आहे. भंडारदर्‍यामध्ये 12 तासांमध्ये झालेल्या पावसात भंडारदरा धरणात 68 दक्षलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, श्रीमरामपूर, कोपरगाव, पारनेर, नेवासा, श्रीगोंदा, शेवगाव तालुक्यात पावसाने हजेेेेरी लावली.

 
मुळा -भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. भंडारदरा येथे दोन तासात 47 मि. मी.पाऊस पडला. यामुळे धरणात 68 दलघफूट नवीन पाण्याची आवक झाली. तालुक्यातील कोतूळ व राजूर परिसरालाही पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह अकोले शहर व परिसरातही सायंकाळी पावसाने हजेरी लावली. आढळा विभागातही पावसाची बुरबुर सुरु होती.

 
त्यातील 38 दलघफूट पाण्याचा वापर झाला. तर 30 दलघफूट पाणी धरणात साठविले गेले आहे. काल सायंकाळी भंडारदरा धरणात 1 हजार 938 दलघफूट इतका पाणीसाठा होता. धरणातून सध्या 872 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. तर निळवंडे धरणात 691 दलघफूट पाणी साठा असून सध्या निळवंडे धरणातून 1 हजार 200 क्यूसेकने प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरु आहे.

 
अहमदनगर शहर व परिसर, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा, अकोले, संगमनेर या तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर तालुक्यात पावसाची रिमझिम सुरु होती. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांच्या पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 
पारनेर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कर्जुले हर्या येथे शनिवारी दुपारी झालेल्या वादळी वार्‍यासह पाऊस झाला. या पावसात वीज पडून जयराम भाऊसाहेब उंडे या शेतकर्‍याचे दोन बैल मृत्यूमुखी पडले आहेत. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर, भाळवणी, कान्हूर, सारोळा आडवाई, कर्जुले हर्या आदी परिसरात झालेल्या पावसाने ओढ्यांना पूर आला होता. यावेळी परिसरात 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

 
संगमनेर तालुक्यातील साकुर येथे काल शनिवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास प्रचंड वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा फटका साकूर येथील आश्रमशाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या लग्नसमारंभास बसला. लग्नसमारंभाकरिता उभारण्यात आलेला मंडप वादळी वार्‍यामुळे कोसळला. यामध्ये मंडपवाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवतहानी झाली नाही.

 
नेवासा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील चांदा परिसरात झालेल्या वादळी वार्‍यासह पावसामध्ये अनेक शेतकर्‍यांचा कांदा भिजला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामध्ये भेंडा परिसरातील डाळिंब व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नेवाशात पावासाचे पाणी अनेक दुकानदारांचे घरामध्ये शिरले आहे.

LEAVE A REPLY

*