Monday, April 29, 2024
Homeमनोरंजनजेष्ठ संगीतकार 'राम लक्ष्मण' यांचं निधन

जेष्ठ संगीतकार ‘राम लक्ष्मण’ यांचं निधन

मुंबई | Mumbai

मराठी आणि हिंदी या दोन्ही चित्रपटसृष्टीत आपल्या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांचे शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते एका दिर्घ आजारामुळे त्रस्त होते. राम लक्ष्मण यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. मुंबईत आल्यावर त्यांची ओळख बासरी वादक सुरेंद्र हेंद्रे यांच्याशी झाली. या जोडीने सिनेसृष्टीत मोठे योगदान दिले. विजय पाटील यांना घरी लखन म्हणत असल्याने दादा कोंडके यांनी या जोडगोळीचे ‘राम लक्ष्मण’ असे नामकरण केले. सुरेंद्र हेंद्रे यांच्या निधनानंतर नुसत्या लक्ष्मण नावाने संगीत देणे त्यांना पटले नाही आणि त्यांनी राम लक्ष्मण या नावानेच आपली कारकीर्द चालू ठेवली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली. मराठीत ‘पांडू हवालदार’च्या यशानंतर ‘राम राम गंगाराम’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘आली अंगावर’, ‘आपली माणसं’, ‘हीच खरी दौलत’, ‘देवता’, ‘लेक चालली सासरला’ अशा अनेक मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. तर हिंदीत ‘हम से बढकर कौन’, ‘सुन सजना’, ‘दिवाना तेरे नाम का’, ‘पोलिस पब्लिक’, ‘हंड्रेड डेज’, ‘दिल की बाजी’ ‘पत्थर के फुल’ आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. 1989 च्या ‘मैने प्यार किया’ या सलमान माधुरी दीक्षित अभिनीत चित्रपटाने त्यांना अमाप यश आणि नाव दिले. यासाठी त्यांना फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. त्या नंतरचे ‘हम आप के है कौन’ व ‘हम साथ साथ है’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले.

‘ढगाला लागली कळ’, ‘मुझसे जुदा होकर तुम्हें दूर जाना है’, ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान’, ‘देवा हो देवा गणपती देवा’, ‘गब्बर सिंग कह के गया’, ‘सुन बेलिया’, ‘तुम क्या मिले जाने जाना’, ‘दीदी तेरा देवर दिवाना’, ‘ये तो सच है की भगवान है’ ही त्यांची गाणी आजही रसिकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या गाण्यांच्या संगीताची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या