मुंबई - Mumbai

बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु असताना समोर आले. कलाविश्वातील अनेक दिग्गजांची नावे या प्रकरणी उघड झाली आहेत. एनसीबीने अनेकांची चौकशीदेखील केली आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह या सारख्या काही आघाडीच्या अभिनेत्रींचीदेखील यात चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे अभिनेत्री सारा अली खानच्या हातून अनेक मोठ-मोठे चित्रपट ड्रग्स प्रकरणी नाव आल्यानंतर गेल्याचे पाहायला मिळत आहे. ‘हिरोपंती 2’ नंतर आणखी एक चित्रपट साराला गमवावा लागला आहे.

‘फिल्मफेअर’ने दिलेल्या वृत्तानुसार, साराच्या हातून काही दिवसांपूर्वी ‘हिरोपंती 2’ हा चित्रपट गेल्यानंतर आता साराला ‘अॅनिमल’ या चित्रपटातूनदेखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आधी साराच्या नावाची अॅनिमल या चित्रपटासाठी चर्चा होती. पण, तिच्या जागी आता अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला रिप्लेस करण्यात आले आहे.

संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटाची 2021 या नव्या वर्षाच्या सुरुवातीला घोषणा केली. अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर आणि परिणीती चोप्रा हे कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. सारा अली खानदेखील या कलाकारांसोबत झळकणार होती. पण तिच्या जागी आता तृप्ती डिमरी झळकणार आहे.