प्रसिद्ध अभिनेत्याकडून सेन्सॉर बोर्डातील भ्रष्टाचाराची पोलखोल; एकनाथ शिंदेंना टॅग करत म्हणाला, “चित्रपटासाठी ६.५ लाख...”,

प्रसिद्ध अभिनेत्याकडून सेन्सॉर बोर्डातील भ्रष्टाचाराची पोलखोल; एकनाथ शिंदेंना टॅग करत म्हणाला, “चित्रपटासाठी ६.५ लाख...”,

मुंबई | Mumbai

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विशालने CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) मुंबईच्या अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचा आरोप केला आहे. विशालचा ‘मार्क अँटनी’ हा चित्रपट 15 सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. हा तामिळ भाषेतील सायन्स फिक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाची हिंदी आवृत्ती सेन्सॉरने पास करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना 6.5 लाख रुपयांची लाच द्यावी लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशालने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ जारी करून हे सर्व आरोप केले आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने सांगितले की, CBFCच्या मुंबई कार्यालयात बसलेल्या अधिकाऱ्यांनी त्याचा नवा चित्रपट ‘मार्क अँटनी’च्या हिंदी आवृत्तीचे सेन्सॉर प्रमाणपत्र पास करण्यासाठी 6.5 लाख रुपयांची लाच मागितली. या चित्रपटासाठी बरेच काही पणाला लागल्यामुळे त्याच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे विशालने सांगितले. व्हिडिओ अपलोड करताना विशालने लिहिले की, ‘रुपेरी पडद्यावर भ्रष्टाचार दाखवणे ठीक आहे, पण खऱ्या आयुष्यात तो पचवता येत नाही. विशेषत: सरकारी कार्यालयांमध्ये आणि CBFC मुंबई कार्यालयात याहून वाईट घडत आहे.

मार्क अँटनी या माझ्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी मला दोन व्यवहारांमध्ये 6.5 लाख रुपये द्यावे लागले. यापैकी मी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी 3 लाख रुपये आणि प्रमाणपत्रासाठी 3.5 लाख रुपये दिले. विशाल पुढे म्हणाला, ‘मी हे माझ्यासाठी नाही तर इतर निर्मात्यांसाठी करत आहे. माझ्या कष्टाचा पैसा भ्रष्टाचारात गेला का? अजिबात नाही.. इथे मी सर्व पुरावे शेअर करत आहे. मला आशा आहे की नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होईल.

व्हिडिओमध्ये विशालने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच त्याने ज्या खात्यांमध्ये 3 आणि 3.5 लाख रुपये स्वतंत्रपणे जमा केले आहेत त्यांचा तपशीलही अपलोड केला आहे. तामिळ चित्रपट ‘मार्क अँटोनी’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे ज्यामध्ये विशाल दुहेरी भूमिकेत दिसत आहे. त्याच्याशिवाय एसजे सूर्या, रितू वर्मा आणि सुनील यांच्यासह अनेक कलाकार यात दिसत आहेत. हा चित्रपट दक्षिणेत चांगली कामगिरी करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com