Surekha Sikri : टीव्हीच्या ‘आजीबाई’ सुरेखा सिक्री यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहे का?

jalgaon-digital
3 Min Read

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि अनेक सिनेमे-मालिकांमधून लोकांची मनं जिंकणारी अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे शुक्रवारी, १६ जुलै २०२२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुरेखा सीकरी ७५ वर्षांच्या होत्या. नुकताच त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता.

टीव्हीच्या जगात ‘दादी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेखा सिक्री, यांनी छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली. सुरेखा सिक्री यांनी मोठ्या पडद्यावर बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि टीव्ही विश्वात काम करूनही बरीच प्रसिद्धी मिळवली. चला तर मग जाणून घेऊयात टीव्हीच्या ‘आजीबाई’ सुरेखा सिक्रीबद्दल काही गोष्टी.

१९ एप्रिल, १९४५ रोजी जन्मलेल्या सुरेखा यांनी तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. चित्रपट आणि टीव्ही व्यतिरिक्त सुरेखा सिक्री थिएटर कलाकार देखील होत्या. त्यांनी १९७८ मध्ये ‘किस्सा कुर्सी का’ या राजकीय चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. हिंदी व्यतिरिक्त त्या मल्याळम चित्रपटांचा देखील भाग राहिल्या आहेत.

‘बालिका वधू’ मालिकेमध्ये सुरेखा यांनी एका कडक आजीसासूची भूमिका साकारली होती, जिच्या आदेशाशिवाय घरातील पानही हलत नसे. तथापि, काळानुसार त्यांचे वागणे बदलत जाते आणि जी आजीसासू सूनबाईंना रागवत असे, तिच नंतर त्यांना आईपेक्षा जास्त जीव लावू लागली. या भूमिकेत सुरेखा यांना चांगलीच पसंती मिळाली होती.

‘बालिका वधू’ व्यतिरिक्त त्यांनी ‘एक था राजा एक थी राणी’ या शोमध्ये ज्येष्ठ राणी आईची भूमिका साकारली होती. त्याचवेळी त्यांनी ‘परदेस में है मेरा दिल’ मध्ये इंदुमती लाला मेहराची व्यक्तिरेखा साकारली होती. सुरेखा सिक्री टीव्हीच्या जवळजवळ सर्व मालिकांमध्ये आजी किंवा मोठी आई म्हणून दिसल्या आहेत. मात्र, प्रत्येक वेळी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाचा एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. त्यांच्या चित्रपटांमधील अभिनयालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

त्यांच्या काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘तमस’ (१९८६), ‘नजर’ (१९९१), ‘सरदारी बेगम’ (१९९६), ‘सरफरोश’ (१९९९), ‘तुमसा नहीं देखा’ (२००४) यांचा समावेश आहे. साल २०१८ मध्ये रिलीझ झालेल्या ‘बधाई हो’ या विनोदी चित्रपटामध्ये, त्यांनी आयुष्मान खुरानाची आजी दुर्गा देवी कौशिकची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही जिंकला.

आपल्या कारकीर्दीत बरेच हिट चित्रपट आणि मालिका देणाऱ्या सुरेखा सिक्री एकेकाळी आर्थिक संकटातून जात होत्या. दरम्यान, त्यांना अचानक ब्रेन स्ट्रोक आला. पैशाअभावी त्यांच्या उपचारातही अडचणी निर्माण झाल्या होत्या. ‘बधाई हो’च्या रिलीझच्या वेळीही त्यांना असाच स्ट्रोक आला होता. यामुळे त्यांना अर्धांगवायूही झाला. यानंतरपासून एक नर्स नेहमी त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांच्यासोबत असत. आजारपणात मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *