
सातारा | Satara
गौतमी पाटील, या नावाने सध्या महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलंय. नृत्यांगणा गौतमी पाटीलचे (Gautami Patil) सर्वच कार्यक्रमांना एकच गर्दी असते. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई वाटेल ते करायला तयार असते. एका बाजूला तिचा डान्स पाहण्यासाठी एकच गर्दी होतेय.
त्याचबरोबर सोशल मीडियावर सुध्दा अनेक व्हिडीओ व्हायरल (Gautami Patil Viral Video) झाले आहेत. अनेकांनी गौतमी पाटील अश्लील डान्स करीत असल्याचा आरोप केला आहे. प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील हीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान गौतमी पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळत निर्दोष असल्याचा दावा केला. मी पूर्वी चूक केली होती पण आता मी ही चूक करत नाही. माझे सगळे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत. जर चूक केली तर माझ्या विरोधात कायद्यानुसार कारवाई करू शकता. पण चूक केली नसताना उगाच माझ्यावर आरोप करायचे आणि माझ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी करायची हे अन्यायकारक असल्याचे गौतमी पाटीलने सांगितले.
कोणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी एक कलाकार आहे आणि माझी कला सादर करत आहे, असे गौतमी पाटील म्हणाली. तिने अश्लील नृत्य करत असल्याचा आरोप फेटाळला. लोकांचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते माझे कार्यक्रम बघतात. माझ्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मी गावोगावी जाऊन माझी कला सादर करते; असेही गौतमी पाटील म्हणाली.
गौतमी पाटील हीच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावेळी गौतमी वर लावणी क्षेत्रातील अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती.
गौतमी आपल्या कार्यक्रमात अश्लिल हावभाव करते, लोकांना घाणारडे हातवारे करते, शॉर्ट कपडे घालते हे असले प्रकार लोककलेत व लावणीत येतच नाहीत. लावणीकडे बघण्याचा महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती जपावी. तिने लावणीच करावी अश्लीलपणा करू नये असं म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली होती.